गुन्हे वृत्त
---
गरोदर महिलेचा
उपचारादरम्यान मृत्यू
मालेगाव ः चंदनपुरी (ता. मालेगाव) येथील पारू सोमनाथ सोनवणे (वय ३१, रा. सबस्टेशनजवळ) या गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला तिचा भाऊ रवी पवार याने ५ ऑक्टोबरला सायंकाळी सातला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान साडेसातला तिचा मृत्यू झाला. डॉ. भामरे यांनी तपासून तिला मृत घोषित केले. किल्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
---
सत्तर हजारांची
सोन्याची पोत लंपास
मालेगाव ः येथील शोभा पारस पहाडे (रा. आदिनाथ शाळेजवळ) यांच्या गळ्यातील ७० हजारांची सोन्याची पोत पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्याने हिसकावून पोबारा केला. ३० सप्टेंबरला सायंकाळी पावणेसातला पारस निवाससमोर वाव्हळकर हॉस्पिटलजवळ हा प्रकार घडला. पारस प्रकाशचंद पहाडे (वय ४५, रा. आदिनाथ शाळेजवळ) यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
---
ज्वार्डी बुद्रुक येथे
एकास मारहाण
मालेगाव ः ज्वार्डी बुद्रुक (ता. मालेगाव) येथे घरासमोर लोखंडी कंपाउंडचे कॉलम टाकण्यावरून एकास जबर मारहाण करण्याचा प्रकार घडला. श्रावण उत्तम दैतकार (वय ६०) त्यांच्या घरासमोर गेटसाठी लोखंडी कंपाउंडचे कॉलम भरत असताना तेथे राजेंद्र दैतकार, प्रवीण काकळीज (रा. वाके), भाऊसाहेब दैतकार, योगेश दैतकार, संजय दैतकार, रोशन दैतकार, महेंद्र दैतकार (सर्व रा. ज्वार्डी बुद्रुक) आले. त्यांनी कॉलम टाकण्यावरून भांडणाची कुरापत काढून श्रावण यांना शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा संदीप यालाही दुखापत झाली. श्रावण यांच्या पत्नीचे मंगळसूत्र गहाळ झाले. ५ ऑक्टोबरला दुपारी चारला हा प्रकार घडला. तालुका पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
---
ट्रकची दुचाकीला धडक;
एक ठार, दोन जखमी
मालेगाव ः मुंबई-आग्रा रस्त्यावरील अल फैज कंपनीसमोरील रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील एकजण ठार, तर दोघे जखमी झाले. सुकदेव हरसिंग सोनवणे (वय ४२, रा. अजंदे खुर्द) हीरो होंडा स्प्लेंडरने (एमएच १५, एसी ८४०३) येसगाव येथून अजंदे खुर्दकडे जात असताना मालेगावहून धुळेकडे जाणाऱ्या ट्रकने (एचआर ४७, एच ६३८८) दुचाकीला धडक दिली. अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या आक्काबाई पवार (वय ४८) यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुकदेव यांची पत्नी अनिता यांना गंभीर दुखापत झाली. तसेच सुकदेव यांनाही दुखापत झाली. १ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. पवारवाडी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध (नाव, गाव माहीत नाही) अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.
---
ॲपे रिक्षाच्या धडकेत
दुचाकीस्वार जखमी
मालेगाव ः गिलाणे (ता. मालेगाव) येथील गणेश मधुकर आहिरे (वय २७) हे होमगार्ड गिलाणेहून मालेगावकडे दुचाकीने येत असताना येसगाव खुर्द शिवारातील ठाकरे फाटा येथे समोरून येणाऱ्या ॲपे रिक्षाने (एमएच ४१, सी ५६७१) धडक दिली. अपघातात गणेश यांना गंभीर मार लागून दुखापत झाली. तालुका पाेलिस ठाण्यात ॲपे रिक्षाचालक जयेश उर्फ गणेश प्रदीप बागूल (रा. गिलाणे) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.