आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ७ : येथील कॅम्प व वडनेर खाकुर्डी पोलिस ठाणे हद्दीत हिंमतनगर व वैतागवाडी परिसरात दोन गटांत वाद होऊन हाणामारीचा प्रकार घडला होता. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्या अनुषंगाने डॉ. चैतन्य देवरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन देणार होते. मात्र निवेदन न देता तहसील कार्यालयाजवळ तासभर कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे आंदोलनकर्त्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे छावणी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई देवीदास पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
येथील कॅम्प रस्त्यावर डॉ. चैतन्य देवरे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. कॅम्प भागातील मोसम नदीपात्रात व जलसंपदा हद्दीत अनधिकृत भराव व पट्टी घरे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला अडचण निर्माण होत आहे. यासाठी डॉ. देवरे यांचे शिष्टमंडळ निवेदन देणार होते. त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी नवीन तहसीलसमोर धरणे आंदोलन केले. एकात्मता चौक ते कॉलेज स्टॉपकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता. रस्ता बंद करून वाहतुकीस अडचण निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली. डॉ. चैतन्य देवरे, ललित गोरस, अक्षय काळे, अक्षय वाघ, रवी पुजारी, चिरंजीव सानप यांच्यासह ५० ते ६० आंदोलनकर्त्यांंवर गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित घटनेचा पोलिस हवालदार किशोर साळवे तपास करीत आहेत.