रेल्वमार्गाचे भू-संपादन तातडीने पूर्ण करावे
मनमाड- इंदूर रेल्वेमार्ग : रेल्वे मंत्रालयाच्या धुळे- नाशिकच्या प्रशासनाला सूचना
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.४ : यंत्रमाग उद्योगात अग्रेसर असलेल्या मालेगाव शहराचा देशातील पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ११० शहरांमध्ये समावेश आहे. मालेगाव वगळता अन्य सर्व शहरे रेल्वेमार्गाशी जोडले गेले आहेत. मालेगावला रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी मनमाड- मालेगाव- धुळे- इंदूर या प्रस्तावित रेल्वेमार्गा साठी तातडीने भू-संपादन पूर्ण करावे, अशा सूचना रेल्वे मंत्रालयाने जिल्हा प्रशासनाला केल्या.
प्रस्तावित रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.४) नाशिक व धुळे जिल्हा प्रशासनाशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, भाग्यश्री विसपुते (धुळे), नाशिकच्या सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी भू- संपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधताना लवकरच हा विषय मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रस्तावित रेल्वेमार्ग व औद्योगिक क्लस्टर विकास या दोन्ही बाबींमुळे मालेगावच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळू शकणार आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीचा खर्च व वेळ कमी होण्यास मदत होईल. मालेगावच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे.
---
मालेगावच्या विकासाचा नवा अध्याय
मालेगाव शहराचा विकास केवळ रेल्वे कनेक्टिव्हिटीपुरता मर्यादित न ठेवता औद्योगिक क्लस्टरच्या माध्यमातून शहराला सक्षम औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. त्या साठी औद्योगिक क्लस्टरच्या विकासाला चालना देण्याबाबत बैठकीत निर्देश देण्यात आले. दरम्यान, जिल्हा प्रशासन, रेल्वे यंत्रणा तसेच उद्योग विभागाच्या समन्वयातून या प्रस्तावाच्या पुढील कार्यवाहीला गती दिल्यामुळे मालेगावच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होण्यास मदत होणार आहे.
-------------
फोटो क्रमांक :- एच-34505