वाहनाच्या धडकेत
तरुणाचा मृत्यू
मुंबई-आग्रा महामार्गावरील वाके शिवारातील घटना
मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील वाके शिवारात चारचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला. अर्जुन रोहिदास आहिरे (वय १९, रा. जाजुवाडी, मालेगाव, मूळ रा. देवळा) हा फाउंटन हॉटेलसमोरून पायी रस्ता ओलांडत होता. त्यावेळी मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या टाटा इंट्रा वाहनाने (एमएच १५ जेसी १८२२) त्याला धडक दिली. डोक्याला, हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने अर्जुनचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दाभाडीत घराजवळून
स्विफ्ट कार चोरीला
मालेगाव : दाभाडी येथील सौरभ देविदास मानकर (वय २४, रा. जिरे गल्ली) यांची अडीच लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार (एमएच ०१ ईई ००९७) चोरट्यांनी लंपास केली. ३० सप्टेंबरच्या रात्री साडेनऊ ते १ ऑक्टोबरच्या सकाळी सहाच्या दरम्यान घराजवळ उभी केलेली कार चोरीला गेली. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
किरकोळ कारणावरून
तरुणास मारहाण
मालेगाव : अब्दुल्लानगरातील पानटपरीजवळ किरकोळ कारणावरून तरुणास मारहाण करण्यात आली. गुलाम अशरफ मोहम्मद इस्लामुद्दीन (वय २५, रा. अब्दुल्लानगर) याने रेहान अहमद रईस अहमद (रा. शफियाबाद) याच्याकडे दुचाकीच्या नुकसानभरपाईचे पैसे का दिले नाहीत, अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने रेहानने गुलामला शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉड व दगडाने डोक्यावर मारून जखमी केले. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जुन्या वादातून
तरुणास मारहाण
मालेगाव : सर्वे क्रमांक ५५ परिसरातील राहुल विनोद मोहिते (वय २०) हा शौचालयासाठी नदीकाठी जात असताना सुमित मगरे व निलेश मगरे (वय ५५) यांनी त्याला अडविले. मागील भांडणाची कुरापत काढून सुमितने कटरने राहुलच्या अंगावर वार केले. निलेशने लाकडी दांड्याने मारहाण केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.