मेन
---
फोटो- 16049, 16050
मालेगाव कॅम्प : जुना आग्रा रोडवर सिमेंट काँक्रिटचा रस्ता मधोमध फोडून भूमिगत गटारीचा मार्ग तयार करताना जेसीबी.
---
रस्ता बनवून वर्षभरातच पुन्हा खोदकाम
जुना आग्रा महामार्ग भूमिगत गटारीसाठी फोडला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता. ६ : शहरातील जुना आग्रा महामार्ग सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याने गुळगुळीत झाल्याने वाहतूक व्यवस्था सुखकर झाली आहे. रस्त्याचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले नाही तोच ड्रेनेजसाठी पुन्हा रस्ता खोदला जात असल्याने अनेकांनी तोंडात बोटे घातली आहेत. रस्ता बनविण्याआधीच भुयारी गटारीचे काम का करण्यात आले नाही, असा प्रश्न येथे उपस्थित केला जात आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराने चांगले रस्ते खराब होत आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांचे करोडो रुपये खर्चून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. येथील जुना आग्रा महामार्गाचे काम प्रदीर्घ काळ चालल्यानंतर ते पूर्ण झाले. मोतीबाग नाका ते दरेगावपर्यंत जुना आग्रा महामार्ग गुळगुळीत झाला आहे. शहरात दोन्ही बाजूने प्रवेशाचा हा मार्ग वाहतुकीसाठी सुखकर झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. जेमतेम वर्षातच पुन्हा भुयारी गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू झाले आहे. रस्त्याच्या खोदकामामुळे मालेगावकरांचा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संताप होत आहे. याचा जाब विचारायचा तरी कोणाला, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
या कारभारामुळे शासन व महापालिकेस कर भरणाऱ्या नागरिकांना मात्र रोज धुळीचा, खड्ड्यांचा आणि वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘रस्ता बनवा आणि खोदा’ हेच जणू येथे ब्रीदवाक्य झाल्याचे मानले जात आहे. या नियोजनशून्य उधळपट्टीवर वरिष्ठ पातळीवरून चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
शहरातून जाणाऱ्या जुन्या आग्रा रस्त्यावर अहोरात्र वर्दळ असते. मुळात या रस्त्याच्या कामाला तब्बल सहा वर्ष लागली. ओवाडी नाला व दरेगाव नाला येथील काम अद्यापही अपूर्णच आहेत. एकीकडे या रस्त्याचे काम पूर्ण होण्याची नागरिक वाट पाहत असतानाच, आता या मार्गावर चक्क सिमेंट काँक्रिटचा रस्ता फोडून भूमिगत गटारीची मार्ग तयार करण्याचा घाट घातला जात आहे. पोकलेन आणि जेसीबीच्या सहायाने सिमेंटचे भलेमोठे खडक उपटून बाजूला फेकले गेले असून, संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे.
---
कोट
मालेगाव मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार म्हणजे करदात्या नागरिकांच्या पैशांची थेट उधळपट्टी आहे. आधी करोडो रुपये खर्चून सिमेंटचे रस्ते बनवायचे आणि मग भूमिगत गटारीच्या नावाखाली तेच रस्ते जेसीबी लावून उद्ध्वस्त करायचे, हा कोणता विकास? रस्ता खोदल्यानंतर दगड-माती टाकून डागडुजीचा केवळ दिखावा केला जातोय. सामान्य नागरिक मात्र धुळीने अन् खड्ड्यांनी हैराण आहेत. हा प्रकार तातडीने थांबवावा अन्यथा प्रशासनाविरोधात मालेगावकरांना सोबत घेऊन जनआंदोलन छेडले जाईल.
- सचिन देशमुख,
सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव