esakal | Maharashtra Day 2021 : एकाच कुंडीत साकारला महाराष्ट्राचा नकाशा!

बोलून बातमी शोधा

maharshtra map
Maharashtra Day 2021 : एकाच कुंडीत साकारला महाराष्ट्राचा नकाशा!
sakal_logo
By
राजेंद्र बच्छाव

इंदिरानगर (नाशिक) : कोरोना काळात सर्वत्र नकारात्मक वातावरण असताना पेठ रोड येथील कल्पना कुशारे यांनी आपल्या बागकामाच्या आवडीतून महाराष्ट्र दिननिमित्त एकाच कुंडीत राज्यातील ३६ जिल्ह्यांना समर्पित प्रत्येकी एक असे रोप लावून या बहरलेल्या कुंडीला महाराष्ट्राच्या नकाशाचे रूप देऊन अनोख्या पद्धतीने त्या महाराष्ट्र दिन साजरा करत आहेत. त्यांची ही कलाकृती सध्या त्यांच्या परिचितांमध्ये फेव्हरिट ठरली आहे.

३६ रोपांद्वारे कुंडीतच साकारला महाराष्ट्राचा नकाशा

महाराष्ट्राच्या सर्व संतांनी दिलेली समता, एकता, बंधुतेची शिकवण, सर्वधर्म सहिष्णूतेचा संदेश आणि संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून संपूर्ण विश्वासाठी केलेली प्रार्थना जगणारा आपला महाराष्ट्र असून, ते अधोरेखित करण्यासाठी ही कल्पना सुचल्याचे सौ. कुशारे सांगतात. संत तुकडोजी म्हणतात, त्याप्रमाणे ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे’, या अभंगात सांगितल्याप्रमाणे वड, चिंच, कांचन, कोरफड, राम तुळस, सब्जा, ऑफिस टाइम प्लॅन्ट, सॉँग ऑफ इंडिया, बांबू, पर्पल हार्ट, चिनी गुलाब, मनी प्लॅन्ट, बूच, बखाना, तगर, गव्हांकूर, दूर्वा, क्रोटन, पुदिना, तरोटा, गोकर्ण, गुळवेल, रिबन ग्रास, लिंबू , क्रोटन, बिट्टी, गवती चहा, हिरवी मिरची, ब्रह्मकमळ, जास्वंदी, बोगनवेल लाल, बोगनवेल पांढरी, शेवंती, अंम्रेला पाम आणि गुलबक्षी या ३६ रोपांना नियमित पाणी आणि आवश्यक त्या सेंद्रिय खताच्या जोरावर त्यांनी फुलवले आहे. राज्याचा नकाशा आकारास येण्यासाठी या रोपांची वाढ आणि वाढीची दिशा त्यांनी हवी तशी ठेवण्यासाठी रोजचे तीन ते चार तास यावर मेहनत घेतली. ही कुंडी तयार करत असताना कोरोना आणि इतर नकारात्मक बाबींपासून स्वतःला त्यांनी दूर ठेवलेच शिवाय अनोख्या पद्धतीने महाराष्ट्र दिनही साजरा केला.

विविधतेत एकता ही विचारसरणी

वडिलांची राज्य सरकारची आणि पती विजय कुशारे यांच्या केंद्र सरकारी नोकरीमुळे विविध प्रदेशांतील लोकांशी सलोख्याचे संबंध राहिले. त्या-त्या भागातील रोपांचा अभ्यास करणे हा छंदच लागला. त्यातून विविधतेत एकता ही विचारसरणी अंगवळणी पडली आणि त्यातून ही कल्पना सुचली. - कल्पना कुशारे