‘मॅपकॉन’ परिषद उद्यापासून

‘मॅपकॉन’ परिषद उद्यापासून
Published on: 
‘मॅपकॉन’ परिषद उद्यापासून सुमारे पंधराशे डॉक्‍टरांच्‍या उपस्‍थितीत ‘ज्ञानाचा महाकुंभ’ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २० ः महाराष्ट्र असोसिएशन ऑफ फिजिशियन्सतर्फे आणि असोसिएशन ऑफ फिजिशियन्स नाशिकच्या नेतृत्‍वाखाली सोळावी वार्षिक राज्यस्तरीय परिषद ‘मॅपकॉन २०२६’चे आयोजन केले आहे. ही चार दिवसीय परिषद गुरुवार (ता. २२)पासून हॉटेल ‘ट्रीट’ येथे होणार आहे. या परिषदेत सुमारे पंधराशे डॉक्‍टर सहभागी होणार असल्‍याची माहिती आयोजन समिती अध्यक्ष डॉ. नारायण देवगावकर, सचिव डॉ. समीर चंद्रात्रे, डॉ. प्रीतम अहिरराव, डॉ. समीर शाह यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. देवगावकर म्‍हणाले, की वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानाचा संगम घडविण्यासाठी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘ज्ञानाचा महाकुंभ’ अशी ठेवली आहे. परिषदेत फिजिशियन्स, वैद्यकीय तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थी सहभागी होतील. परिषदेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (ता. २२) दोन कार्यशाळा होतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कार्यशाळेत वैद्यकीय क्षेत्रात वेगाने विस्तारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये कसा उपयोग करावा, यावर आधारित प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाईल. पॉइंट ऑफ केअर अल्ट्रासाउंड विषयावर डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात प्रत्यक्ष अल्ट्रासाउंड आणि टू-डी इकोच्या वापराबाबतच्‍या कार्यशाळेत होईल. परिषदेच्या तीन मुख्य दिवसांमध्ये शुक्रवार (ता. २३) ते रविवार (ता. २५) दरम्‍यान गोदावरी, गौतमी आणि नंदिनी या तीन पवित्र नद्यांच्या नावाने विविध सभागृहांमध्ये एकाच वेळी वैज्ञानिक सत्रे चालतील. परिषदेचे औपचारिक उद्‌घाटन महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे आदींच्‍या उपस्‍थितीत होईल. डॉ. चंद्रात्रे म्‍हणाले, की हृदयरोग, अतिरक्तदाब (हायपरटेन्शन) आणि हार्ट फेल्युअरचे व्यवस्थापन याविषयी परिषदेत चर्चा होईल. मधुमेह, लठ्ठपणा आणि नव्या इनक्रेटिन थेरपीचा वापर, तसेच क्षयरोग, डेंगी व संसर्गजन्य आजारांची नवीन मार्गदर्शक तत्त्वे, आयसीयू व्यवस्थापन, सेप्सिस आणि क्रिटिकल केअर, संधिवात, न्यूरोलॉजी आणि अवयव प्रत्यारोपणाच्या आधुनिक पद्धतीवर तज्‍ज्ञ मार्गदर्शन करतील. तसेच डॉ. भागवत औरंगाबाद मेमोरिअल ओरेशन (डॉ. जगदीश हिरेमठ), ठाणे-वाशी ओरेशन (डॉ. शशांक जोशी) आणि प्रेसिडेन्शियल ओरेशन (डॉ. एस. व्ही. कुलकर्णी) या विशेष व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे. आध्यात्मिक व सांस्कृतिक अनुभव नाशिकच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव प्रतिनिधींना मिळण्यासाठी शुक्रवारी व शनिवारी सायंकाळी साडेसहाला रामतीर्थ येथे गोदावरी आरतीचे आयोजन केले आहे. तसेच प्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वर, शिर्डी, सप्तशृंगगड, पंचवटी आणि स्थानिक वाइनयार्ड्सना भेट देण्याची संधीही उपलब्ध असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com