धुळे : टुडे पान २ साठी.. अँकर
--
फोटो क्रमांक : 31894
धुळे : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त सत्कार्योत्तेजक सभेच्या मुक्तद्वार वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर.
--
मराठी ही सर्व भाषांमध्ये महान : शेलकर
--
धुळ्यात अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : ज्याप्रमाणे जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा महान असते, त्याचप्रमाणे मातृभाषा मराठी ही सर्व भाषांमध्ये महान आहे, असे प्रतिपादन स्पर्धाप्रमुख राजश्री शेलकर यांनी केले. सत्कार्योत्तेजक सभेचे जानकीबाई रघुनाथ देशपांडे मुक्तद्वार वाचनालय यांच्यामार्फत अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त वाचनालयात अभिजात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती शेलकर बोलत होत्या.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. विश्वास नकाणेकर, वाचनालयाचे कार्याध्यक्ष डॉ. सचिन चिंगरे, स्पर्धाप्रमुख शेलकर, सदस्य विजय अग्रवाल, समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्याध्यक्ष प्रा. देवेंद्र डोंगरे, केंद्राचे संचालक डॉ. एन. एम. जोशी यांच्यासह वाचक उपस्थित होते. सुरुवातीला अभिनेते नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रीमती शेलकर यांनी मराठी ही मायबोली असल्याचे सांगत भाषा संवर्धनासाठी आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. वाचनालयाचे कार्याध्यक्ष चिंगरे यांनी मराठी ही प्राचीन आणि गोड भाषा आहे. ‘ळ’ चा उच्चार अनेक भाषांमध्ये नाही त्यामुळे मराठी भाषा समृद्ध आहे. विद्यार्थ्यांनी मराठीचा अभ्यास करून युपीएससी व एमपीएससी परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. नकाणेकर यांनी ‘अभिवृत्ती’, ‘अभिप्राय’, ‘अधीक्षक’ हे शब्द समजावून सांगितले. सर्वांनी मराठी भाषा उत्तम प्रकारे बोलण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, अनेक संस्थांची ब्रीदवाक्ये मराठीत असल्याचे सांगत सत्कार्योत्तेजक सभेचे ब्रीदवाक्य समजावून दिले आणि ज्ञानेश्वरी, रामदास, तुकाराम यांच्या साहित्याचे महत्त्व पटवून दिले. ग्रंथपाल गौरव वाणी, सहायक ग्रंथपाल गोरख सूर्यवंशी, लिपिक प्रशांत वाघमारे, शिपाई विजय बागूल यांनी संयोजन केले.