एन्कर
लोगो : मराठी अभिजात भाषा गौरव दिन विशेष
अभिजात मराठीची वाटचाल आधुनिकतेच्या दिशेने
विद्यापीठ, बुद्धिजीवी व शिक्षण व्यवस्थेची भूमिका महत्त्वाची
------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२: मराठी भाषेच्या भवितव्याबाबत भीती व्यक्त करण्यापेक्षा तिच्या परिवर्तनशीलतेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. नव्या पिढीने स्वीकारलेले शब्द, तंत्रज्ञानातील बदल आणि भाषेतील नवे प्रवाह हे मराठीच्या अस्तित्वाला धोका नसून तिच्या सतत विकसित होत राहण्याचे लक्षण आहे. मराठीची परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधत गेल्यास मराठी भाषा भविष्यातही तितकीच सक्षम, समृद्ध आणि जिवंत राहील ३ ऑक्टोबर २०२४ मध्ये मराठी भाषेला केंद्र शासनाकडून ‘अभिजात भाषा’ दर्जा मिळाला. त्यानंतर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाकडून घेण्यात आला. दोन वर्षात मराठी भाषेत कोणकोणते बदल झाले, यासंदर्भात विविध समित्यांवर काम करणाऱ्या तज्ञांनी नोंदविलेले निरीक्षण
---चौकट
फोटो : H31156
तंत्रज्ञानाच्या युगात वावरणारी तरुण पिढी काही काळासाठी नव्या शब्दांचा आणि भाषेच्या नव्या शैलींचा वापर करते; मात्र ही भाषिक टूम तात्पुरती असते. त्यामुळे अशा बदलांमुळे मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात येते, असे मानण्याचे कारण नाही. उलट, काळानुसार नवे शब्द स्वीकारत मराठी अधिक समृद्ध आणि सूक्ष्म होत जाते. जर भाषेतील बदलांमुळे मातृभाषा नष्ट होत असती, तर ज्ञानेश्वरी आज कालबाह्य झाली असती आणि संत तुकारामांचे अभंग तरुण पिढीपर्यंत पोहोचले नसते. ‘डिअर तुकोबा’, ‘विठ्ठल मिसिंग पंढरपूर’ यांसारखी तरुणांनी लिहिलेली पुस्तके हेच सिद्ध करतात की, नव्या पिढीचा मराठीशी असलेला संवाद जिवंत आहे; केवळ त्याचे स्वरूप बदलले आहे. आपली लिपी देखील चित्ररूप चिन्हांपासून उत्क्रांत होत आजच्या स्वरूपात आली आहे. त्यामुळे भाषा कधीही स्थिर नसते; ती काळानुसार बदलत, नवे शब्द आत्मसात करत आणि नव्या पिढीच्या अभिव्यक्तीला सामावून घेत पुढे जात असते.
-प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती
-----चौकट
फोटो :H31177
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असले तरी, त्यातून अभिजात मराठीच्या संवर्धनाचे आणि विकासाचे ठोस काम होऊ शकत नाही. सरकारीकरणातून बाहेर पडून विशेषतः विद्यापीठे, महाविद्यालये आणि बुद्धिजीवी वर्गाने या कामाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. कृषी, आरोग्य, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, लोकजीवन अशा विविध क्षेत्रांतील मराठीतील पारंपरिक संदर्भांचे समकालीन संदर्भात रूपांतर करणे, त्यावर संशोधन करणे आणि ते नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे विद्यापीठांची जबाबदारी आहे. ‘अभिजात’ म्हणजे केवळ प्राचीन किंवा जुन्या वाङ्मयापुरते मर्यादित नसते. भाषा ही इतिहासातील पूर्वसंदर्भ आणि वर्तमानकाळ यांच्यातील सांधा जोडण्याचे काम करते. पूर्वी संतपरंपरेने लोकभाषेच्या माध्यमातून खेड्यापाड्यांतील जनमानसात विचार रुजविले. आज त्याच धर्तीवर समाजीकरण आणि सांस्कृतीकरणातून बुध्दजीवींची संख्या कमी झाल्याने भाषेचे कार्य मंदावलेले आहे.
-डॉ. रमेश वरखेडे, अध्यक्ष, भारतीय अभिजात भाषा मंडळ
------चौकट
फोटो : H31155
दक्षिण भारतीय आपल्या मातृभाषेच्या अस्मितेसाठी ठामपणे उभे राहतात; त्या तुलनेने मराठी अस्मिता अधिक प्रखरपणे व्यक्त होणे आवश्यक आहे. मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर, मराठी शाळा टिकवणे आणि त्यांची गुणवत्ता वाढवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मराठी शाळा बंद पडत असताना केवळ भाषेच्या गौरवाची चर्चा करून उपयोग नाही; त्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मराठी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांऐवजी कायमस्वरूपी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांची भरती झाली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमातून उच्च शिक्षणाच्या संधी वाढवणे, मराठीतील ज्ञाननिर्मितीला चालना देणे आणि विद्यार्थ्यांना मराठीतून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे यावर भर दिला पाहिजे. मराठी अभिजात आहे. तिचे जतन करून तिचे ‘अभिजातपण’ जगभर पाेहचविले पाहिजे.
-लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, मराठी भाषा सल्लागार समिती
--------