NSK26H31231
जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना कवी संतोष साळवे. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील व प्रा. ललिता हिंगोणेकर.
साहित्य हा समाजाचा खरा आरसा
डॉ. पाटील : ‘नूतन मराठा’त मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३ : साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून, उत्तम साहित्य माणसाला जीवन जगण्याची कला शिकवते. साहित्याच्या सहवासातून विद्यार्थ्यांची विचारसरणी प्रगल्भ होऊन संवेदनशील आणि सुजाण व्यक्तिमत्त्व घडते, असे प्रतिपादन नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी केले.
नूतन मराठा महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन उत्साहात झाले. या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटील बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक संतोष साळवे उपस्थित होते. प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख प्रा. ललिता हिंगोणेकर यांनी मंडळाच्या वर्षभरातील उपक्रमांची माहिती दिली. प्रा. राकेश गोरसे यांनी कवी संतोष साळवे यांचा परिचय करून दिला. उद्घाटनपर व्याख्यानात संतोष साळवे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.ए. मराठी अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या ‘किंमत’ या स्वतःच्या कवितेचा भावार्थ आणि त्यामागील सामाजिक जाणीव उलगडून सांगितली.
कार्यक्रमाला प्रा. सी. आर. सोडवले, प्रा. ललिता हिंगोणेकर आदी उपस्थित होते. प्रा. रामेश्वर निंबाळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. वंदना पाटील यांनी आभार मानले.