Marathi Rangbhoomi Din : रंगभूमीवर नाटकांची पुन्हा नांदी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Rangbhoomi Din

Marathi Rangbhoomi Din : रंगभूमीवर नाटकांची पुन्हा नांदी!

नाशिक : रंगकर्मींच्या पावलांची सय त्याला संगीताची लाभणारी साथ, नेपथ्याने बहरलेला अन् प्रकाशाने उजळलेला मंच म्हणजे रंगभूमी. प्रत्येक रंगकर्मीच्या जीवनातील अत्यंत पूजनीय असणाऱ्या अन् खऱ्या अर्थाने रंगकर्मींचे आयुष्य घडविणाऱ्या रंगभूमी प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिन म्हणजेच मराठी रंगभूमी दिन.

१८४३ साली याच दिवशी चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवरा’ पासून या मराठी रंगभूमीचा खऱ्या अर्थाने पाया रचला गेला. मात्र, कोरोना दोन वर्षांच्या काळात रंगभूमी सुनी झाली होती, आता चित्र बदलत असून यंदा या मराठी रंगभूमीवर तिसरी घंटा मोठ्या उत्साहात वाजणार आहे. (Marathi Rangbhoomi Din Dramas on stage again after 2 years of corona nashik news)

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळातील निर्बंधातून रंगभूमीही सुटली नव्हती. अनेक रंगकर्मी पुन्हा रंगमंचावर पदार्पण करण्यास उत्सुक होते. मात्र आलेली परिस्थिती अशी होती की कोणीही काहीही करू शकत नव्हते. आता कोरोना ओसरला अन् रंगभूमीवर नाटकांची नांदी पुन्हा सुरू झाली. कोरोनाच्या काळात सतत पुढे ढकलली गेलेली आणि रंगकर्मींसाठी बहुप्रतिक्षित होऊन बसलेली ६० वी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा मोठ्या उत्साहात सर्वत्र पार पडली. येथून खऱ्‍या अर्थाने रंगभूमीचा थांबलेला प्रवास पुन्हा सुरु झाला.

रंगभूमीवर सादरीकरणासाठी रंगकर्मी जितके उत्सुक होते तितकेच उत्सुक यासाठी प्रेक्षकही होते. नाटक असो की संगीत मैफलीचे कार्यक्रम प्रायोगिक असेल किंवा व्यावसायिक थिएटरच्या बाहेर हाऊसफुलची पाटी पाहायला मिळत होती. आणि खऱ्या अर्थाने रंगकर्मींना सुखावणारी बाब आहे. विशेष म्हणजे हा अनुभव नाशिकमध्ये आला. यंदा नाशिकमध्ये व्यावसायिक नाटक अन् संगीत कार्यक्रमांची मांदियाळीच भरली होती. स्वर- झंकार सारखा संगीताचा कार्यक्रम असेल किंवा, सारखं काहीतरी होतंय, संज्या- छाया, चार-चौघी, पुनश्च हनीमून, आमने - सामने, हरवलेल्या पत्त्यांचा बंगला ही सर्व व्यावसायिक नाटके हाऊसफुल होती.

हेही वाचा: Salt Side Effets : मिठाचा खडा खा अन् आरोग्‍य बिघडवा..!

६० व्या राज्य नाट्य स्पर्धेपासून रंगभूमीला लागलेला ब्रेक मोकळा झाला. त्यात आता अधिकची भर पडली, ती ५९ आणि ६० व्या राज्य नाट्य स्पर्धेचे एकत्रित झालेले पारितोषिक वितरण. त्यामुळे रंगकर्मींच्या आनंदाला उधाण तर आलेच मात्र सर्वांना आता ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेचे वेध लागले आहे. बाल रंगभूमीलाही चांगले दिवस आले असून बाल-नाट्यही मोठ्या प्रमाणावर व्यावसायिककडे वळू लागली आहे. यंदा १५ नोव्हेंबरपासून ६१ व्या राज्य नाट्यस्पर्धेची तिसरी घंटा वाजणार आहे. यंदा नेहमीपेक्षा अधिक संघांनी आपला प्रवेश नोंदविला असून यात ५ ते ६ नवीन संघांचा सहभाग असणार आहे. एकूणच काय तर यंदा साजरा होणारा मराठी रंगभूमी दिन हा दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर नाटकांच्या मांदियाळीने मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

"यंदाचा रंगभूमी दिन हा उत्साहात साजरा केला जाणारा आहे. प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांसह बाल- नाट्याची मोठी मेजवानी रसिक प्रक्षकांना मिळते आहे. ही रंगभूमी अन् रंगकर्मींसाठी मोठी सुखावणारी बाब आहे." - श्रीराम वाघमारे, रंगकर्मी

"शहरात मोठ्या प्रमाणावर नाटक साजरे होत असून, त्याला प्रेक्षकांचाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभतो आहे. त्यामुळे रंगकर्मींमध्ये सादरीकरणाचा उत्साह वाढतो आहे, हीच खरी रंगकर्मींकडून रंगभूमी दिनाला रंगभूमी प्रति कृतज्ञता आहे."- आनंद जाधव, नाट्यसेवा

"यंदा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये होत असलेले प्रवेश यातून रंगकर्मींचा उत्साह अन् रंगभूमी प्रतीची आस्था दिसून येते आहे. यातून मराठी रंगभूमीला पुन्हा सोन्याचे दिवस येतील हे नक्की."

- राजेश जाधव, समन्वयक, राज्य नाट्यस्पर्धा केंद्र नाशिक

हेही वाचा: Nashik Political : उद्धव ठाकरे सेनेच्या दुसऱ्या फळीवर शिंदे गटाची नजर!

टॅग्स :NashikDrama Theaters