एन्कर
लोगो : मराठी रंगभूमी दिनविशेष
वॉटर डिमरपासून ते एआयच्या झगमगाटापर्यंत
मराठी रंगभूमीवरील प्रकाशयोजनांचा थक्क करणारा प्रवास
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : काळानुसार नाटकाचा आशय आणि अभिव्यक्ती बदलत गेली तशी, पडद्यामागची तांत्रिक भूमिका आमूलाग्र पध्दतीने बदलली. विशेषतः रंगभूमीवरील प्रकाशयोजना नाटकाचा जीव की प्राण मानला जातो. हा प्रवास जुन्या काळातील अत्यंत खडतर प्रयोगांपासून ते आजच्या अत्याधुनिक संगणकीय आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगापर्यंतचा प्रकाशमय प्रवास थक्क करणारा आहे.
काळाच्या पटलावर मागे वळून पाहिल्यास, जुन्या पिढीतील रंगकर्मींचे किस्से अंगावर काटा आणतात. एकेकाळी रंगमंचावर पुरेसा प्रकाश राहावा यासाठी प्रचंड कसरत करावी लागे. सुरवातीच्या काळात ‘वॉटर डिमर’ रंगमंचावरील दिवे मंद वा प्रखर करण्यासाठी ‘प्रकाश नियंत्रक’ होता. त्याला ‘लिक्विड किंवा सॉल्ट वॉटर डिमर’ असेही म्हटले जात. आज आधुनिक काळात इलेक्ट्रॉनिक्स डिमर्स वापरले जातात. पूर्वी मोठ्या भांड्यात मिठाच्या पाण्यात अर्थिंग मिळण्यासाठी धातूची पट्टी पाण्यात खोलवर सोडली जात; त्या पाण्यातून विजेचा प्रवाह जात. त्यातून रंगमंचावरील दिवे प्रखर होत. जेव्हा पट्टी हळूहळू वर उचलली जात तेव्हा विजेचा रोध वाढायचा आणि दिवे मंद होत. थोडक्यात, दिव्यांच्या प्रखरतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिठाच्या पाण्यात ट्यूब किंवा बल्ब टाकून मॅन्युअली प्रकाश कमी-जास्त केला जात. हा प्रयोग काहीसा धोकादायक आणि कष्टाचा असल्याने विजेचा झटका बसण्याची शक्यता असायची. त्यासाठी प्रकाशाची अचूकता साधणे कठीण प्रकाशयोजनाकारांसाठी आव्हान असे. त्यानंतर ‘डिमर’ आले आणि काहीसे काम सोपे झाले. तरीही प्रत्येक दृश्यागणिक, पात्राच्या संवादानुसार आणि भावनांनुसार ‘लाइट’ बदलण्यासाठी कलाकारांना आणि तंत्रज्ञांना प्रचंड मेहनत घ्यावी लागे.
--चौकट
अत्याधुनिक यंत्रणांनी सुलभता
आजचे चित्र पूर्णपणे पालटले आहे. आज रंगभूमीवर एआय आणि आधुनिक संगणकीय प्रणालींचे राज्य आहे. संगणकाच्या एका क्लिकवर किंवा आधीच ठरविलेल्या प्रोग्रॅमिंगनुसार संपूर्ण नाटकाची प्रकाशयोजना नियंत्रित केली जाते. संगीत, पात्रांचे हावभाव आणि संवादाची वेळ ‘टायमिंग’ नुसार सेकंदाच्या शंभराव्या भागात प्रकाश बदलणे आता शक्य झाले आहे. रोबोटिक लाईट्स आणि एआयच्या मदतीने नाटकातील भावनांना नेमका न्याय देणारे रंग आणि छटा एका बटणावरून निर्माण करता येतात. आजच्या या तंत्रज्ञानाने काम सुलभ झाले असली तरी, जुन्या काळातल्या मिठाच्या पाण्याच्या दिव्यांमध्ये रंगभूमीबद्दलची एक वेगळीच निष्ठा आणि जिव्हाळा होता. आजचा नाटकातील प्रकाशझोत केवळ तंत्रज्ञानाची प्रगती दाखवत नाही, तर नाटकावर असणारे कलाकारांचे प्रेम आणि काळासोबत बदलण्याची तयारी अधोरेखित करते.
-- कोट
१९७४ पासून नाट्य क्षेत्रात काम करतोय. काळानुसार तांत्रिक बाबी अत्याधुनिक झाल्या आहेत. पूर्वीच्या वॉटर डिमरपासून ते आत्ताच्या संगणकीकरणामुळे नाटकाचा सराव बघितला तरी, लाइटाचे प्रोग्रॅमिंग संगणकात लोड करून लाइट आपोआप ऑपरेट होतात. नाटक सुरू असताना फक्त लक्ष द्यावे लागते.
-रवी रहाणे, प्रकाशयोजनाकार
--------------------