टुडे एक
---
NSK26H35189
पाल (ता. रावेर) : पोलिसांनी जप्त केलेल्या गांजासह संशयित मेहरबान तडवी व पोलिस पथक.
पाल येथून सव्वातीन किलो गांजा जप्त
एक लाख ६२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; तरुणाला अटक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : अंमली पदार्थांच्या अवैध विक्री आणि साठवणुकीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, पाल (ता. रावेर) येथे एका घरावर छापा टाकून तीन किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेल्या या गांजाची किंमत एक लाख ६२ हजार ५०० रुपये आहे. याप्रकरणी मेहरबान जहाँगीर तडवी (वय ३६, रा. पाल) याला पोलिसांनी अटक केली. सोमवारी (ता. १६) दुपारी ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन रोखण्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १६ नोव्हेंबरला जिल्हाभरात ‘ऑपरेशन ऑल आउट’ ही विशेष मोहीम राबविण्यात आली. या अनुषंगाने रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी अवैध अंमली पदार्थांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांची माहिती संकलित करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार मेहरबान तडवी याने स्वतःच्या मालकीच्या दुमजली घरात गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने सोमवारी दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी संबंधित घरावर छापा टाकला.
चौकट
पोलिसांचा घरावर छापा
घराच्या प्रवेशद्वारासमोरील जिन्याखाली लपवून ठेवलेला तीन किलो २५० ग्रॅम गांजा पोलिसांना आढळून आला. हा गांजा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचा संशय असून, पोलिसांनी तो जप्त केला. यावेळी संशयित मेहरबान तडवी याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक मनोज महाजन तपास करीत आहेत.