वणी- श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर सोमवारी (ता. २६) सोमवती अमावास्येनिमित्त होणाऱ्या यात्रोत्सवावर प्रशासनाने असुरक्षित मार्ग व भाविकांच्या गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने बंदी घातली आहे. सलग तीन वर्षांपासून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यात्रोत्सव व भाविकांना सुरक्षा, सोयी-सुविधांसाठी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यात्रोत्सवात भाविकांना मार्कंडेय ऋषींच्या दर्शनास बंदी घालून प्रशासन जबाबदारीतून मुक्तता मिळवत श्रद्धेला बाधा पोहोचवत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.