Nashik News : सासुरवासाला कंटाळून विवाहितेची मुलांसह आत्महत्या...; पतीला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

suicide news

Nashik News : सासुरवासाला कंटाळून विवाहितेची मुलांसह आत्महत्या...; पतीला अटक

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील मोह गावालगत असलेल्या पाझर तलावात आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तीस वर्षीय महिलेसह तिच्या दहा वर्षांची मुलगी व आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. शनिवारी (ता. 1) सकाळी 11 वाजेपासून हे तिघेही घरातून बेपत्ता झाले होते. मयत विवाहितेच्या भावाच्या फिर्यादीवरून तिचा पती व सासू सासरे, दीर व जाऊ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पती व सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सिन्नर - नाशिक महामार्गावरील मोह येथील ज्योती विलास होलगीर (28) ही विवाहिता मुलगी गौरी (10 वर्षे ) व मुलगा साई (8 वर्ष) यांच्यासह शनिवारी दुपारी साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचे सासरे पांडुरंग कारभारी होलगीर यांनी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. रविवारी (ता. ०२) नऊ वाजेच्या सुमारास होलगीर वस्ती जवळ असलेल्या पाझर तलावाच्या पाण्यावर या तिघांचेही मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहाय्यक निरीक्षक तुषार गरुड, संदेश पवार, उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन, हवालदार मनीष मानकर, प्रशांत वाघ, शशिकांत निकम, रोशन गायकवाड, प्रकाश उंबरकर, बाळासाहेब सानप यांच्या पथकाने घटनास्थळी गाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने तिघांचे पाण्याबाहेर काढून सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी या तिघांनाही मयत घोषित केले.

दरम्यान मृत ज्योतीचा भाऊ सुनील चिंधु सदगीर (रा. हिसवळ ता. नांदगाव) याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात येत बहिणीचा घातपात झाल्याची तक्रार केली. पती विलास पांडुरंग होलगीर, सासरे पांडुरंग कारभारी होलगीर, सासू फशाबाई पांडुरंग होलगीर, दीर अमोल पांडुरंग होलगिर, जाऊ सुनीता अमोल होलगिर यांच्याकडून माहेरून पैसे आणावेत म्हणून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळा कंटाळून बहिणीने भाच्यांसह आत्महत्या केल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत प्राथमिक चौकशी करून विवाहितेचा पती विलास होलगिर, सासरा पांडुरंग होलगीर व सासू फशाबाई होल गीर यांना अटक केली आहे.