जावळीसारख्या दुर्गम तालुक्यातून पुढे आलेल्या, बालपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या आणि आईच्या कष्टातून घडलेल्या आंतरराष्ट्रीय सायकलपटू मयूर पवार यास नुकतेच पुण्यात शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले. शासनाच्या क्रीडाप्रबोधिनी या उपक्रमातून खेडोपाड्यातील सरकारी शाळांतून शिकणारी कितीतरी मुले खेळाडू म्हणून घडली. राज्य, राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी गाजविल्या. इतकेच काय, अशी मुले ऑलिंपिकपर्यंतही पोचली. सातारा जिल्ह्यात अशी संख्या खूप आहे.