‘एमबीबीएस’च्‍या विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल ‘मायक्रो’ची परीक्षा | MBBS Students | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBBS student

‘एमबीबीएस’च्‍या विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल ‘मायक्रो’ची परीक्षा

नाशिक : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्‍या द्वितीय वर्षातील मायक्रोबायोलॉजी-१ या विषयाची लेखी परीक्षा पुन्‍हा होणार आहे. यापूर्वी शुक्रवारी (ता.११) झालेला या विषयाचा पेपर रद्दबातल ठरविला असून, आता तो २६ मार्चला पुन्हा घेतला जाणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी आदेश जारी केले आहेत

द्वितीय वर्ष एमबीबीएस (२०१९) या अभ्यासक्रमाच्‍या मायक्रोबायोलॉजी-१ या विषयाची लेखी परीक्षा ११ मार्चला दुपारच्‍या सत्रात राज्‍यातील ४१ परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेतील विद्यार्थ्यांची कामगिरी रद्दबातल करण्यात आली आहे.

महाविद्यालयीन स्‍तरावर झालेल्‍या घटनेमुळे या अभ्यासक्रमाच्‍या काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, तसेच विद्यापीठ कार्यप्रणालीत असलेली पारदर्शता व विश्‍वासार्हता कायम राहावी, यासाठी या विषयाची पुनर्परीक्षा घेण्यात येत आहे. त्‍यामुळे २६ मार्चला सकाळी साडेदहा ते दुपारी दीड या वेळेत हा पेपर पुन्हा घेतला जाईल. यापूर्वीच्या परीक्षा केंद्रावरच विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. तसेच यापूर्वी अनुपस्‍थित असलेल्‍या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येईल. मात्र, द्वितीय वर्ष एमबीबीएस जुना अभ्यासक्रमाची या विषयाकरिता पुनर्परीक्षा घेतली जाणार नाही. त्‍यांचे यापूर्वी ११ मार्चला झालेल्‍या परीक्षेवर आधारीत मूल्‍यमापन केले जाईल, असेही परिपत्रकात स्‍पष्ट केले आहे.

काय आहे नेमका प्रकार...

लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाने घेतलेल्या सराव परीक्षेतील बहुतांश प्रश्‍न आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य परीक्षेत जसेच्‍या तसे विचारल्‍याचे बोलले जात होते. संबंधित महाविद्यालयाने नोव्हेंबर २०२१ ला मायक्रोबायोलॉजी विषयाची शंभर गुणांची परीक्षा घेतली होती. या परीक्षेत वर्णनात्मक प्रश्‍न विचारले होते. या सराव परीक्षेतील प्रश्‍नपत्रिकेमधील सात वर्णनात्मक प्रश्‍न मुख्य परीक्षेत विचारल्‍याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याची तातडीने दखल घेत विद्यापीठ स्‍तरावर या विषयाची पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.

Web Title: Mbbs Student Will Have To Retake The Microbiology Exam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top