उपचारात हलगर्जीची चौकशी करून कारवाई करा
‘सिव्हिल’चे पदव्युत्तर महाविद्यालयाला पत्र : नातलगांचे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १९ : जिल्हा रुग्णालयाच्या पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टर व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नातलगांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात आंदोलन करीत संबंधितांवर तत्काळ कारवाई करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रकरणाची दखल घेत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना लेखीपत्राद्वारे या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची सूचना केली आहे.
विष्णू आनंद काकवीपुरे (वय ४०, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने शनिवारी (ता. १७) सायंकाळी ६.२० ला त्यांच्या पत्नी सोनाली यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्या वेळी आपत्कालीन कक्षात असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात सोनोग्राफी करून आणण्याचा सल्ला दिला; परंतु त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतानाही त्यांनी कोणतेही उपचार केले नाही. त्र्यंबक नाक्यावरील खासगी रुग्णालयात सोनाली या पतीला घेऊन गेल्या असता, त्याचठिकाणी विष्णू कोसळले. त्यांना पुन्हा सातला बेशुद्धावस्थेत जिल्हा रुग्णालयात आणले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अवघ्या ४० मिनिटांमध्ये सदरचा प्रकार घडल्याने सोनाली यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला होता.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी दीपक ढोके यांनी मृत विष्णू काकवीपुरे यांच्या नातलगांसह सोमवारी (ता. १९) सकाळी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात ठिय्या मांडत संबंधितांवर कारवाई करीत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, जिल्हा रुग्णालय परिसरातील पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय बंद करण्यात यावे, अशीही मागणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांनी याची दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना लेखी पत्र देत सखोल चौकशी करून कठोर कारवाईची सूचना केली आहे.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके, सोनाली काकवीपुरे, चर्मकार समाज युवा नेते सुनील ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, योगेश कांबळे, सोपान कडलग, विनोद शेळके, रवींद्र कासवे, सुजाता कदम, भारती गवळी, सागर सुरंजे, संदीप मोरे, मुकेश गांगुर्डे, उत्तम जाधव आदी उपस्थित होते.
मंत्र्यांकडून दखल
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन व व्हॉट्सॲपद्वारे घटनेची माहिती देण्यात आली. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही फोनवरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शिंपी यांना कारवाईचे आदेश दिले.
फोटो H3304०/H33041
नाशिक : उपचारात हलगर्जी प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश शिंपी यांच्या दालनात सोमवारी आंदोलन करताना शिवसेनेचे दीपक डोके व मृत रुग्णाचे नातलग. दुसऱ्या छायाचित्रात डॉ. शिंपी यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी व मृताचे आप्तस्वकीय.