इंजिनिअर ते ध्येयधुरंधर सरपंच : मेघराज आव्हाड यांच्या ‘पाटोळे पॅटर्न’ची यशोगाथा
लीड
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट हा केवळ शासकीय योजनांवर अवलंबून नसतो, तर त्याला गरज असते एका ध्येयधुरंधर, अभ्यासू आणि लोककल्याणकारी नेतृत्वाची. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाटोळे गावाने असाच एक लोकाभिमुख आणि अभ्यासू नेता अनुभवला आहे, ज्यांचे नाव आहे मेघराज सुरेश आव्हाड. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, गुणवत्तेच्या आणि कष्टाच्या जोरावर शैक्षणिक यश संपादन करणाऱ्या मेघराज आव्हाड यांनी आपल्या गावाचा कायापालट करण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि ‘पाटोळे पॅटर्न’सारख्या अनोख्या उपक्रमांमुळे आज पाटोळे गावाची ओळख एक ‘स्वच्छ, सुंदर आणि आदर्श गाव’ म्हणून संपूर्ण राज्यात निर्माण होत आहे.
---
प्रतिकूल परिस्थितीवर मात आणि शैक्षणिक उत्कर्ष
मेघराज आव्हाड यांचा जन्म एका सर्वसामान्य आणि आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पाटोळे येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण डुबेरे येथील शाळेत झाले. १९९० मध्ये दहावीच्या परीक्षेत तब्बल ८७ टक्के गुण मिळवून त्यांनी डुबेरे विद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची नांदी दिली. दहावीनंतर त्यांनी शासकीय पॉलिटेक्निकमधून बांधकाम क्षेत्रातील पदविका (डिप्लोमा सिव्हिल इन इंजिनिअरिंग) पूर्ण केली. व्यवसाय सुरू केल्यानंतरही शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी ‘एएमआयई’ पदवी संपादन केली. जी पदवीधर अभियंत्या (बी. ई. सिव्हिल) समकक्ष मानली जाते. अनुभव, गुणवत्तेची साथ आणि कामातील सचोटी यामुळे त्यांना ‘एल ॲन्ड टी’ सारख्या नावाजलेल्या नामांकित कंपनीसोबत काम करण्याची संधी मिळाली. पुढे नाशिक महापालिकेत कंत्राटदार म्हणून काम करताना त्यांचा बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर बहरला.
---
सामाजिक, शैक्षणिक योगदान आणि राजकीय नेतृत्व
व्यवसायात यश मिळवूनही मेघराज आव्हाड यांचे पाय जमिनीवरच राहिले. गावाशी असलेले नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. समाजात आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्याची आवड असल्याने त्यांनी २०१० मध्ये पाटोळे येथे ‘ज्ञानदीप ॲकॅडमी’च्या तीन शाखा सुरू करून शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. २०१५ मध्ये संगीत भागवत सप्ताहाचे भव्य आयोजन करून गावाला एकत्र आणले.
त्यांच्या याच सामाजिक आणि परोपकारी वृत्तीमुळे २०१५ च्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाटोळे ग्रामस्थांनी त्यांच्या नेतृत्वावर बिनशर्त विश्वास दाखविला. ग्रामस्थांनी मेघराज आव्हाड आणि त्यांच्या पॅनलच्या सर्व सदस्यांना बिनविरोध निवडून दिले. सरपंचपदाचे आरक्षण महिला राखीव झाले, तरी ग्रामस्थांनी त्यांच्या पत्नी स्मिता आव्हाड यांचीही बिनविरोध निवड करून गावाची धुरा या आव्हाड दांपत्याच्या खांद्यावर सोपविली. राजकारणाचा लवलेशही नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील या तरुणाने गावकऱ्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवत विकासाचा नवा अध्याय सुरू केला.
---
क्रांतिकारी पाटोळे पॅटर्न
पाटोळे गावाची भौगोलिक रचना उंच-सखल असल्याने गावात नेहमी असमान पाणी वितरण व्हायचे. काही भागांत पाच ते दहा फुटांच्या खड्ड्यात उतरून पाणी भरावे लागायचे, तर काही ठिकाणी पाणीच पोहोचत नसे. या समस्येवर मेघराज आव्हाड यांनी आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा उपयोग करून एक अनोखा तोडगा शोधून काढला, जो पुढे ‘पाटोळे पॅटर्न’ म्हणून प्रसिद्ध झाला. त्यांनी संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून उच्च तंत्रज्ञानाचा आणि ‘प्रेशर लिक्विड’ सिस्टिमचा वापर केला. उंच टाकीवरून एकाच वेळी २० मिनिटांत सर्वांना ३०० लिटर पाणी देणारा हा प्रयोग यशस्वी ठरला. यामुळे सर्व ग्रामस्थांना समान दाबाने, समान वेळ आणि समान प्रमाणात पाणी मिळू लागले. पाणी भरताना महिलांची होणारी शारीरिक धावपळ थांबली आणि वेळेची व पाण्याची मोठी बचत झाली. या प्रयोगाचे कौतुक संपूर्ण नाशिक जिल्ह्यात झाले असून, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींनी या मॉडेलचा अभ्यास करून इतर ग्रामपंचायतींसाठी तो मार्गदर्शक ठरविला आहे.
---
सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास
लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासनाचा आदर्श, कोणतीही शासकीय योजना राबवताना ग्रामस्थांना विश्वासात घेणे आणि प्रशासनात संपूर्ण पारदर्शकता ठेवणे, हे मेघराज आव्हाड यांच्या कामाचे मुख्य वैशिष्ट्य राहिले आहे. ग्रामसभांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक निर्णयामध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठांचा सहभाग सुनिश्चित केला गेला. लोकसहभागातून निर्माण झालेल्या निधीचा प्रत्येक रुपया गावाच्या विकासासाठीच वापरला गेला, ज्यामुळे गावकऱ्यांचा सरपंचांवरील आणि प्रशासनावरील विश्वास अधिकच दृढ झाला. दप्तरदिरंगाई आणि राजकीय गटबाजीला थारा न देता केवळ आणि केवळ गावाचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास त्यांनी उराशी बाळगला.
---
गावात विकासाची मालिका आणि डिजिटल पर्व
सरपंचपदाच्या कार्यकाळात मेघराज आव्हाड यांनी लोकसहभागातून आणि विविध शासकीय निधीतून गावात विकासाचा धडाका लावला.
डिजिटल शाळा आणि ‘आयएसओ’ मानांकन : लोकवर्गणीतून प्राथमिक शाळेला अद्ययावत डिजिटल रूप दिले, ज्यामुळे शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे शिक्षण मिळू लागले.
गावातील अंतर्गत रस्ते : आमदार राजाभाऊ वाजे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शीतलताई सांगळे यांच्या सहकार्याने दलित वस्तीसह संपूर्ण गावात सिमेंट काँक्रिटचे रस्ते, गटारी आणि पेव्हर ब्लॉक बसवून गावाचा कायापालट केला.
तीर्थक्षेत्र विकास व हायमास्ट दिवे : तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विविध धार्मिक स्थळांचा विकास केला आणि गावातील मुख्य आठ ठिकाणी हायमास्ट दिवे बसवून गाव प्रकाशमय केले.
---
पर्यावरण, जलसंधारण आणि धार्मिक पर्यटन विकास
गावाच्या शाश्वत विकासासाठी त्यांनी निसर्ग आणि संस्कृतीची सुंदर सांगड घातली. वृक्षारोपण आणि जॉगिंग ट्रॅक विकसित केले. गावाशेजारील टेकडीवर ५५१ झाडांचे संगोपन व संरक्षण करून हरित पट्टा विकसित केला. तसेच निसर्गरम्य वातावरणात ५०० फूट लांबीचा जॉगिंग ट्रॅक उभारला. गावातील विहिरी, ओढे आणि जुन्या नाल्यांचे खोलीकरण व गाळ उपसा करून जलसंधारणाची कामे केली. ज्यामुळे गावातील विहिरींची पाणीपातळी वाढली आणि गाव टंचाईमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. गावाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा महाराजांच्या जुन्या मोडकळीस आलेल्या मंदिराचा लोकसहभागातून भव्य कायापालट केला. राजस्थान येथील जयपूरवरून आणलेल्या आखीव-रेखीव संगमरवरी दगडांमध्ये ४५ फूट उंच गाभारा व मंदिर उभारले. आमदार राजाभाऊ वाजे, खासदार हेमंत गोडसे आणि जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळवत मेघराज आव्हाड यांनी पाटोळे गावाला विकासाच्या शिखरावर पोहोचविले आहे. राजकारणात नसतानाही केवळ समाजकारणाची तळमळ, उच्च शिक्षण आणि कल्पकता यांच्या जोरावर काय साध्य करता येते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मेघराज आव्हाड. ‘स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि आदर्श पाटोळे'' बनविण्याचे त्यांचे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरताना दिसत असून, त्यांचा हा जीवनप्रवास ग्रामीण भागातील तरुण नेतृत्वासाठी सदैव प्रेरणादायी राहील.
---
कोट
राजकारणाचा किंवा कोणत्याही पदप्रतिष्ठेचा विचार न करता गावातील प्रत्येक व्यक्तीला आपले कुटुंब मानून काम करणे, हीच माझी मुख्य भूमिका आहे. लोकसहभाग आणि सहकार्याच्या बळावर पाटोळे गावाला राज्यातील एक मॉडेल आणि ‘स्वच्छ-सुंदर आदर्श गाव’ बनविणे, हेच माझे अंतिम ध्येय आहे.
- मेघराज सुरेश आव्हाड