फोटो - 16241
मालेगाव कॅम्प : चिखलओहोळ येथील महाजन वस्ती ते जळकू शिवार शेत रस्त्यात चिखलाचे साम्राज्य.
------
पाणंद रस्ता अडकला शासकीय फायलींमध्ये!
-------------------------------------
शेतकऱ्यांवर चिखलातून वाट काढण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव कॅम्प, ता.१५ : तालुक्यातील चिखलओहोळ येथील महाजन वस्ती ते जळकू शिवार या दोन किलोमीटरच्या पाणंद रस्त्याचे काम अजुनही शासकीय फायलींमध्येच अडकले आहे. मुख्यमंत्री कार्यालय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींनी तब्बल ८ वेळा उचित कार्यवाहीचे आदेश देऊनही अद्याप मालेगाव तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून दखल घेतली नाही. प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
चिखलओहोळ येथील ''महाजन वस्ती ते जळकू शिवार'' या पांधी रस्त्याचा वापर परिसरातील जवळपास तीनशे शेतकरी व ग्रामस्थ करतात. विद्यार्थी याच रस्त्याने ये-जा करतात. परिसरातील शेतीचे पाणी पांधी रस्त्यावर येत असल्याने येथे कायम चिखल असतो. पावसाळ्यात तर या रस्त्यावर गुडघाभर चिखल साचून वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. सदर रस्त्यासाठी ग्रामपंचायतीने ३० जून २०२५ ला ठराव करून ग्रामस्थांची लेखी संमती घेतली आहे. रस्त्याची मोजणी व मंजुरी व्हावी यासाठी तरुण शेतकरी रुद्र मुरलीधर खैरनार यांनी गेल्या दीड वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत खुद्द मुख्यमंत्री कार्यालय, महसूल मंत्रालय, नाशिक विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी मालेगाव प्रशासनाला कार्यवाहीचे आदेश दिले.
मालेगाव पंचायत समितीने २२ मे २०२६ च्या पत्राद्वारे उपअधीक्षक भूमी अभिलेख मालेगाव यांच्याकडे गट नंबर २०८ ते २३९ चे सीमांकन करण्याचा रीतसर प्रस्तावही पाठवला. मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. सदर रस्त्याची तत्काळ मोजणी करावी. रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी रुद्र खैरनार, गणेश खैरनार, अविनाश खैरनार, देवेंद्र खैरनार, हेमंत खैरनार आदींसह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. मोजणी तात्काळ न झाल्यास २६ जानेवारीला ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.