मासिकधर्म कटकट नव्हे निसर्गाची देण
वैशाली पाटील : गंगामाता विद्यालयात समुपदेशन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
कापडणे, ता. २५ : महिलांच्या आयुष्यात मासिकधर्म ही कटकट नाही. ती तर निसर्गाने दिलेली मोठी देण आहे. मुलींनो सुरुवातीच्या काळात घाबरु नका. तुमची जवळची मैत्रीण आहे. तिला सांगा. संकोच बाळगू नको. ती तुम्हाला तिच्या अनुभवाने योग्य मार्गदर्शन करेल. योग्य काळजी घ्या. मासिकधर्माविषयी अभिमान बाळगला पाहिजे, असे आवाहन राज्यस्तरीय प्रशिक्षक वैशाली पाटील यांनी केले.
वरखेडे (ता. धुळे) येथे नगाव एज्युकेशन सोसायटी संचलित गंगामाता माध्यमिक विद्यालय व (कै.) नगीनभाई रतन पटेल कनिष्ठ महाविद्यालयात ‘सेवा संकल्प अभियान’ व ‘सेवा सप्ताह आरोग्य’अंतर्गत विशेष प्रबोधन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यस्तरीय प्रशिक्षक वैशाली पाटील यांनी मासिक पाळीबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रद्धा दूर करत शास्त्रीय माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, योग्य आहार, मानसिक आरोग्य याबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक एस. बी. सोनवणे, रत्नप्रभा चव्हाण, नीता बडगुजर, स्वाती पाटील, भावना साबळे व स्वाती थोरात यांनी डिजिटल माध्यमातून मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी प्रश्नोत्तर सत्रात मुक्तपणे सहभाग घेतला. ग्रामीण भागातील मुलींमध्ये आरोग्याबाबत जागरूकता व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मुख्याध्यापक सोनवणे यांनी सांगितले.