फोटो : H32036
-----------------
स्पर्धा, व्याख्यानांतून मानसिक आरोग्याचा संदेश
मानसिक आरोग्यासाठी सायकियाट्रिक सोसायटीचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती वाढविणे, मानसिक आजारांबाबतचे गैरसमज दूर करणे आणि मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींना सन्मानाने जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, या उद्देशाने नाशिक सायकियाट्रिक सोसायटीतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम झाले.
मानसिक आजारांनी ग्रस्त व्यक्तींची निःस्वार्थपणे काळजी घेणाऱ्या नातलगांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणाऱ्या रिल्स स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात रुग्णांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर जनजागृती करण्यात आली. आयएमए सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ला यांनी ‘सोशल मीडियाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम’ या विषयावर मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर करताना मानसिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. सायकल रॅलीमध्ये २०० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. वर्तमानपत्रांमधील जनजागृतीपर लेख, विविध व्याख्याने, सोशल मीडियावरील माहितीपूर्ण लेखन आणि अन्य उपक्रमांच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचा संदेश समाजातील विविध स्तरांपर्यंत पोहोचविण्यात आला. उपक्रम यशस्वितेसाठी नाशिक सायकियाट्रिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विलास चकोर, सचिव डॉ. मानस सुळे, खजिनदार डॉ. अनुप भारती यांच्यासह डॉ. ऋचा सुळे-खोत, डॉ. अमोल पुरी, डॉ. अनिता दौंड, डॉ. मुक्तेश दौंड, डॉ. ऋचा छायल आणि डॉ. बिस्वजीत जगताप यांनी परिश्रम घेतले.
------------------------