पान-३
----------
म्हाडाची फसवणूक प्रकरण--लोगो
-------------
३०-२
नायब तहसीलदार पाटीलचा
अटकपूर्व जामीन फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : शहर परिसरातील पाथर्डी शिवारात बनावट कागदपत्रांच्या आधारे म्हाडासाठी आरक्षित असलेली जागा आणि शहराची ''ओपन स्पेस'' बेकायदेशीरपणे हडपल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात दाखल गुन्ह्यातील तत्कालीन नायब तहसीलदार नितीन पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. के. के. पाटील यांनी फेटाळून लावला. न्यायालयाने यापूर्वीच तिघांचे अटकपूर्व जामीन फेटाळले आहेत.
सुमारे २३ वर्षांनंतर खोटे नकाशे, मोजणी नकाशे व हिस्सा फॉर्म तयार करून शासन आणि म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील यांच्या फिर्यादीनुसार पाथर्डी शिवारातील सर्व्हे क्रमांक १७/२/अ आणि १७/२/ब (एकूण क्षेत्रफळ २४,८०० चौ.मी.) हा मोठा भूखंड रहिवासी क्षेत्रात मोडतो. संशयित प्लॉटमालक सिद्धार्थ ओमप्रकाश काबरा, भारती ओमप्रकाश काबरा आणि अरुणप्रकाश पंढरीनाथ आगीवाल यांनी तत्कालीन महसूल अधिकाऱ्यांच्या पत्राचा गैरफायदा घेत तलाठ्याकडून ४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी क्षेत्राचे लहान- लहान ७/१२ उतारे तयार करून घेतले. या प्रकरणात तत्कालीन नायब तहसीलदार नितीन आबाजी पाटील याचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
संशयित सिद्धार्थ व भारती काबरा, आगीवाल यांनीही अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असता न्यायालयाने त्यांचेही अर्ज फेटाळून लावले आहेत. सरकार पक्षासह फिर्यादी पाटील यांच्यातर्फे ॲड. अजिंक्य गिते, ॲड. प्रशांत जाधव व तपासी अधिकारी संतोष फुंदे यांनी युक्तिवाद केला.
--------------