सहा महिन्यांत ११ लाख टन चाराटंचाई
---
फेब्रुवारी ते जुलै २०२७ या कालावधीत उपाययोजनांची गरज
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : खरीप हंगामातील ओल्या व सुक्या चाऱ्याचा जानेवारी २०२७ अखेरपर्यंत पुरेल इतकाच साठा सध्या शिल्लक आहे. त्यानंतरच्या सहा महिन्यांत जिल्ह्यातील १७ लाख जनावरांना तब्बल ११ लाख टन चाऱ्याची गरज भासणार असल्याने त्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत उपाययोजना केल्या जात आहेत.
जिल्ह्यातील १३ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यावर आता चाराटंचाईवर मात करण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पशुसंवर्धन विभागाने नियोजन आढावा बैठक घेतली. त्यानुसार, जिल्ह्यात एकूण १७ लाख ६० हजार जनावरे आहेत. तालुकानिहाय त्यांची संख्या पाहता पशुसंवर्धन विभागाने चाऱ्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला असून, मालेगावमधे ९८ दिवस पुरेल इतकाच साठा आहे. तसेच, सिन्नरला ९० दिवस, येवला ९५ दिवस, चांदवडला १०० दिवस पुरेल इतका चारा शिल्लक आहे. जिल्ह्यात सरासरी साडेतीन महिने पुरेल इतकाच चार असल्याने त्यानंतर भासणाऱ्या चाराटंचाईवर मात करण्यासाठी आतापासून उपाययोजनांची गरज आहे. पशुसंवर्धन विभाग तीन हजार हेक्टरवर चारा पेरणी करेल. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना मोफत चारा बियाणे देण्यात येईल. यात शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीओ) सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे विविध मार्गांनी चारा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. बियाणे मोफत वाटपासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तीन कोटींची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
जिल्ह्यात २४ हजार पशुपालक
जिल्ह्यातील पशुपालकांची संख्या २४ हजार ४२६ इतकी आहे. पशुसंवर्धन विभागाने प्रत्येक तालुक्याकडून बियाणे वाटपाचे प्रस्ताव त्यांच्याकडून मागविले होते. त्यांच्याकडे आतापर्यंत दोन लाख २३ हजार किलोची मागणी नोंदविण्यात आली आहे. साधारणत: ३० हजार हेक्टरवर चारा पेरणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असून, लवकरच त्याची सुरुवात होईल.
प्रशासकीय उपाययोजना
- पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी चारा पेरणीचे नियोजन
- शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून तीन हजार हेक्टरवर चारा लागवड
- निकृष्ट चारा सकस करण्याचे क्षेत्रीय प्रशिक्षण
- एक हजार २०० हेक्टरवर गाळ पेरा
- मुरघास, हायड्रोपोनिक व अझोला उत्पादनास चालना
- जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी
जिल्ह्यातील जनावरे
मेंढी- २.१७ लाख
शेळी- ५.१७ लाख
वासरे- १.५६ लाख
गाय- ७.२८ लाख
म्हैस- १.१६ लाख
चारा उपलब्ध होण्याचे मार्ग (टन)
रब्बी हंगाम- ३.७ लाख
वनजमीन- १.२२ लाख
वैरण बियाणे वाटप- ४ लाख
ऊस- १.१० लाख