Bus Fire Accident : सांगाड्यात राख अन् राखेत हात...जगण्याचीही अनोखी लालसा...| Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Bus Fire Accident

Bus Fire Accident : सांगाड्यात राख अन् राखेत हात...जगण्याचीही अनोखी लालसा...

नाशिक : दोन दिवसांपूर्वी भडभडत्या आगीत राख झालेली बस... याच आगीत १२ जिवांचा होरपळून अंत झालेला... आता, बसचा फक्त लोखंडी सांगाडाच, पण सांगाड्यात होती राख... याच राखेत काही माणसं वखवखत्या नजरेनं काहीतरी शोधत होती. राख राख हातानं चाळत होती. हाताच्या बोटांना लागणारी वस्तू त्यांच्या नजरा निरखायच्या अन्‌ एकीकडे जगण्याच्या आशेत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली, तर दुसरीकडे गेलेल्या त्या माणसांच्या राखेत त्यांच्या किडूक-मिडूकाचा जगण्यासाठी शोधत होती..! (Mirchi Hotel Chowk Bus fire accident case drunk trying to find something in ashes of dead bodies Nashik News)

हेही वाचा: Nashik Bus Fire Accident : अपघातानंतरही प्रशासन ढिम्मच!

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील मिरची हॉटेल चौफुलीवर दोन दिवसांपूर्वी शनिवारी (ता. ८) पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या घटनेनंतर खासगी ट्रॅव्हल्सची बस आगीत जळून खाक झाली. सांगाडाच काय तो उरला. चौफुलीवरच रस्त्यालगत बसचा हा सांगाडा ठेवण्यात आला आहे. या बसमधून त्या रात्री तब्बल ५३ प्रवासी प्रवास करीत होते. प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अपघातानंतर आपले जीव वाचविण्यासाठी बसबाहेर उड्या घेत जीव वाचविले, तर १२ प्रवाशांचा आगीत अंत झाला.

एरवी नातेवाईक अंत्यविधीनंतर उरलेल्या राखेतून अस्थी घेऊन जातात; पण अमरधामच्या आवारात काही महिला, मुले उरलेल्या राखेतही काहीतरी शोधत असल्याचे चित्र नेहमी पाहावयास मिळते. इतकेच नव्हे तर रामकुंडावर राख व अस्थिविसर्जनानंतरही काही मुले पाण्यात डुबकी मारून दोन-पाच रुपयांची नाणी किंवा किडूक-मिडूकाचा (सोनं) शोध घेतात. इथे तर अपघातानंतर भडभडत्या आगीत बस खाक झाली. आता बसच्या सांगाड्यात फक्त राखच उरली आहे. या राखेत ५३ प्रवाशांच्या वस्तूही खाक झाल्या आहेत.

या राखेत आपल्या हाती काहीतरी लागेल म्हणून आजूबाजूच्या झोपडपट्टीतील नशेच्या आहारी गेलेले गर्दुल्ले या सांगाड्यात घुसून चीज वस्तूंचा वखवखलेल्या नजरांनी शोध घेत आहे. मृतांच्या अंगावर असलेले दागदागिने वा प्रवाशांकडील सामानात काही किमती चीजवस्तू आगीत सापडल्याने, त्या सापडण्याच्या लालसेने म्हणा वा जगण्यासाठी लागणाऱ्या या वस्तू सापडाव्यात या हेतूने ही गर्दुल्ल्यांची हातांची बोट काहीतरी शोधत होती. एकीकडे दुर्दैवी घटनेत गेलेली माणसं, तर दुसरीकडे जगण्यासाठी मृतांच्या चीजवस्तू राखेतून हाती लागाव्यात हीच जगण्याची अनोखी लालसा...

हेही वाचा: Nashik Bus Fire Accident : भय इथले संपत नाही...