बेपत्ता तरुणाचा मृतदेह
आढळला कुजलेल्या अवस्थेत
---
असोदा शिवारातील घटना; दुचाकीवरून पटली ओळख
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गलू देवीदास कोळी (वय ३८, रा. भोलाणे, ता. जळगाव) याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शुक्रवारी (ता. १३) जळगाव-भोलाणे रस्त्यावरील असोदा शिवारातील शेतात आढळला. शेतकऱ्याच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, दुचाकीवरून मृतदेहाची ओळख पटली.
गलू कोळी सोमवारी (ता. ९) जळगावला आले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते मिळून न आल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, शुक्रवारी असोदा शिवारातील एका शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. याबाबत शेतकऱ्याने तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या उपस्थितीत मृतदेहाजवळ असलेल्या दुचाकीवरून मृत व्यक्तीची ओळख गलू कोळी अशी पटली. दरम्यान, रामानंदनगर पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध घेताना सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यात गलू कोळी यांनी आकाशवाणी चौकात एका व्यक्तीला सोडल्याचे दिसून आले. त्यानंतर ते भोलाणे रस्त्याने जात असल्याचेही फुटेजमध्ये दिसले होते.
चौकट
पोलिस तपास सुरू
गलू कोळी दुचाकीने घरी परतत असताना, रस्त्यावरील वळणावर त्यांचे वाहन शेतात जाऊन पडले असावे आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.