फोटो : NSK26H33078
नंदुरबार : ‘मिशन सृजन’ प्रदर्शनाची पाहणी करताना प्राचार्या नूतनवर्षा वळवी.
------------
मिशन हायस्कूलमध्ये ‘मिशन सृजन’ प्रदर्शन
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाले प्रोत्साहन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २१ : येथील सुवार्ता अलायन्स मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचालित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात व्यवसाय शिक्षणांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘मिशन सृजन’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कौशल्यातून तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली.
प्रदर्शनात रंगीबेरंगी रांगोळी मॅट, बांबूपासून तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, प्रथमोपचार पेट्या, नैसर्गिक उटणे, शाळेच्या सेंद्रिय परसबागेत पिकवलेला ताजा भाजीपाला तसेच इतर विविध हस्तनिर्मित वस्तू मांडण्यात आल्या. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अनुभवाधारित आणि कौशल्याधारित शिक्षणाला महत्त्व दिले आहे. याच संकल्पनेनुसार उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीद्वारे शिकण्याची संधी मिळाली. वस्तू तयार करणे, त्यांची आकर्षक मांडणी करणे, किंमत निश्चित करणे, ग्राहकांशी संवाद साधणे आणि विक्रीचे व्यवहार समजून घेणे अशा विविध बाबींचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. प्रदर्शनाला पालकांनीही भेट दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंसह सेंद्रिय परसबागेतील भाजीपाल्याची खरेदी केली.
प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष कृतीतून शिकावे. स्वतःच्या कल्पनांना मूर्त स्वरूप द्यावे आणि स्वावलंबनासोबत उद्योजकतेची भावना विकसित करावी, या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला.