
MLA Satyajeet Tambe : शहरात डिजिटल शाळांसाठी 1 कोटींचा निधी : आमदार सत्यजित तांबे
MLA Satyajeet Tambe : महापालिकेच्या ८५० शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नी आमदार सत्यजित तांबे यांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त मनोज घोडे- पाटील, मुख्य लेखाधिकारी नरेंद्र महाजन, शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्यासह पदवीधर शिक्षक संघटनेचे विठ्ठल धनाईत, नितीन नानकर, राजेंद्र दातीर आदी उपस्थित होते.
सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, वरिष्ठ वेतनश्रेणी, वेतन कपात व पदोन्नती, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधांसह अन्य विषयांवर बैठकीत चर्चा झाली. (MLA Satyajeet Tambe statement 1 crore fund for digital schools in city nashik nmc news)
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळणे अपेक्षित होते. मात्र शिक्षण विभागात हा हप्ता अद्याप मिळाला नाही. पात्र शिक्षकांसाठी २०१८ पासून वरिष्ठ वेतनश्रेणी होणे अपेक्षित होते.
ती न झाल्याने शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. २०१६ पासून वरिष्ठ वेतनश्रेणीनुसार फरक बिले, वैद्यकीय बिले मिळणे प्रलंबित आहे. याही मुद्द्यांचा चर्चेत समावेश होता. महापालिकेच्या १०२ शाळांमधून २७ हजार विद्यार्थी शिक्षण घेताहेत.
या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जाकडे लक्ष देण्याचा मुद्दा श्री. तांबे यांनी अधोरेखित केला. महापालिकेच्या आदर्श शाळांसाठी सरकारकडून नुकताच पन्नास लाखांचा निधी मंजूर झाला. तसेच स्मार्टसिटीतंर्गत सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी प्रत्येक शाळेला एक कोटी रुपयांचा निधी आणण्याचे काम श्री. तांबे यांनी केले.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
शिक्षकांच्या बदल्या दरवर्षी मार्चखेरीस कराव्यात. सलग दहा वर्षे एका इमारतीत काम करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या करून ज्या शाळांमध्ये शिक्षकांची चणचण आहे, तेथे नियुक्ती करावी. शिक्षकांचे वेळेत वेळेत व्हावे, कार्यालयीन ‘स्टाफ' परिपूर्ण आणि अभ्यासू असावा.
सेवानिवृत्त होणाऱ्या मुख्याध्यापकांची नोंद घेऊन त्यांची जागा घेऊ शकणाऱ्या शिक्षकांची बढती प्रक्रिया त्वरित सुरू करावी, अशाही मागण्यांबाबत चर्चा झाली.
अंबडच्या शाळेला भेट
श्री. तांबे यांनी अंबड येथील महापालिका माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत त्यांनी प्रश्न जाणून घेतले. नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मल्टीस्कील’, ‘ऑटोमोबाईल’ याबाबत माहिती दिली.