फोटो -16025
मालेगाव : अध्यक्ष मोहन कांबळे यांच्याशी चर्चा करताना प्रांताधिकारी, तहसीलदार. शेजारी पदाधिकारी.
----
नवीन गणेशकुंडासाठी
कॅम्प भागात गांधीगिरी
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २ : कॅम्प भागात नवीन गणेशकुंड तयार करावा. याबाबत तत्काळ ठराव द्यावा, अशी मागणी सार्वजनिक एकता मंचाचे मोहन कांबळे यांनी केली होती. मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे महात्मा गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक एकता मंचाचे अध्यक्ष कांबळे यांनी गांधीगिरी पद्धतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळील प्रभाग एक कार्यालयाजवळ आंदोलन करून मालेगावकरांचे लक्ष वेधून घेतले. प्रशासनाने त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
कॅम्प भागात मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत आहेत. त्यामुळे येथे नवीन गणेश कुंड बांधावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. प्रशासनाला निवेदने देऊनही लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे मोहन कांबळे यांनी गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधींचा पेहराव करून हातात काठी घेत नवीन गणेश कुंड व्हावा, असे फलक हातात घेत शुक्रवारी (ता. २) प्रशासनासह नागरिकांचे लक्ष वेधले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत कांबळे यांना आयुक्तांच्या सहीचे पत्र दिले. पत्रात दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, आम्ही मालेगावकर संघर्ष समितीचे निखिल पवार, केवळ हिरे, बशीर पहेलवान, मधुकर केदारे आदी उपस्थित हाेते.