फोटो क्रमांक : 35255...अनिल पाटील
फोटो क्रमांक ः 35256...वना राऊळ
----
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांचा मृत्यू
---
धुळे जिल्ह्यात घटना; दोन गावांत वाहनाच्या धडकेचे बळी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. धुळे तालुक्यातील गोंदूर आणि लामकानी परिसरात पहाटे सहा ते सातच्या दरम्यान पायी असताना, झालेल्या वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. स्वतःची कोणतीही चूक नसताना केवळ अंधार आणि भरधाव वाहनांमुळे घडलेल्या अपघातात त्या दोघांना आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
पहिल्या घटनेत गोंदूर येथील बांधकाम व्यावसायिक अनिल पाटील शनिवारी (ता. १४) पहाटे पायी असताना, त्यांना अंधारात अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने बांधकाम क्षेत्रासह गोंदूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पत्रकाराचा मृत्यू
लामकानी ः गोंदूर येथील घटना ताजी असतानाच लामकानी येथे अशीच घटना घडली. यात पत्रकार तथा देवेंद्र कृषी सेवा केंद्राचे कर्मचारी ठाणसिंग उपाख्य वना पहाडसिंग राऊळ (वय ४९) यांचा मालवाहू वाहनाच्या (एमएच १८ बीजी ८७१७) धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. १७) पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान लामकानी- निजामपूर रस्त्यावरील महावीर किराणा दुकानासमोर घडली. अपघातानंतर वाहनचालक वाहनासह पसार झाला. या अनपेक्षित घटनेमुळे पीडित कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावणारा होता. वना राऊळ यांच्यावर सायंकाळी पाचला लामकानीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. दगेसिंग राऊळ, इंद्रसिंग राऊळ यांचे ते लहान बंधू होत.
काळजी घेण्याची गरज
सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने पहाटे रस्त्यावर अंधार आणि धुके असते. या वेळेत महामार्गावर, अंतर्गत रस्त्यांवर अवजड व इतर वाहनांची वर्दळ असते. वाहनचालकांना अंधारामुळे रस्त्याच्या कडेने चालणारे पादचारी लवकर दिसत नसल्याने हे जीवघेणे अपघात घडत आहेत. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वेळेचे भान राखून दाट अंधारात मॉर्निंग वॉकला जाणे टाळावे. पहाटे चालताना गडद रंगाचे कपडे टाळून पांढरे, पिवळे किंवा रिफ्लेक्टर (चमकणारे) पट्टे असलेले कपडे अथवा जॅकेट वापरावेत, जेणेकरून वाहनचालकांना लांबूनच अंदाज येईल, तसेच नेहमी वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच येणारी वाहने दिसतील, अशा बाजूने आणि मुख्य डांबरी रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर चालावे. चालताना मोबाईल वापरणे आणि कानात इअरफोन्स घालणे टाळावे, जेणेकरून मागून येणाऱ्या वाहनांचा आवाज स्पष्ट ऐकू येईल व संभाव्य अपघात टाळता येतील.