पान तीन सेकंड मेन
--------------------
16236
मालेगाव : मोसमपूल चौकात झालेली वाहतूक कोंडी
------
मौसम पूल चौकात वाहतूक कोंडी झाली नित्याची
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १४ : शहरात सणासुदीच्या काळात मोसमपूल चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील कापडासह अनेक दालने रस्त्याला लागून आहेत. पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनचालक रस्त्यावरच वाहने उभी करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. महानगरपालिकेने वाहतूक नियंत्रणासाठी १५ वॉर्डन बॉय वाहतूक पोलिसांच्या मदतीला दिले, तरी वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही.
पाच वर्षापूर्वी मोसम चौकात सिग्नल यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. मात्र, ही यंत्रणा अपयशी ठरली. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. रस्ते मोठे झाले असले तरी व्यावसायिक दुतर्फा हातगाड्या लावतात. किरकोळ व्यावसायिकांसाठी येथे हॉकर्स झोन निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे ठेला व हातगाडी चालक आपल्या सोयीने गाड्या लावतात. त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसल्याने रस्ते व्यापले जातात. परिणामी पादचाऱ्यांसह दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
शहराच्या पश्चिम भागात दिवाळी सणामुळे गेल्या पंधरा दिवसापासून सर्वच रस्त्यांवर वाहतूक काेंडी होत आहे. यात मोसम चौकात सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. सटाणा नाका, साठ फुटी रोड, सोमवार बाजार, रावळगाव नाका, डीके चौक या भागात सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी होते. कापड बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. वाहतूक शाखेने किमान गर्दीच्या ठिकाणी सायंकाळी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी अशी मागणी नागरिक करत आहे.