10191
नामपूर : मोराणे ते बिजोरसे दरम्यान मोसम नदीपात्रात असलेले पाणी.
मोराणे-बिजोरसे दरम्यान मोसम नदीवर
पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. ६ : बागलाण तालुक्यातील मोराणे ते बिजोरसे या गावांना जोडणाऱ्या मार्गावर मोसम नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी पुलाची सुविधा नसल्याने नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दोन्ही गावांमधील दळणवळण अधिक सुलभ होण्यासाठी नदीवर कायमस्वरूपी पूल उभारणे गरजेचे आहे.
मोराणे आणि बिजोरसे ही गावे शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाणे तसेच नागरिकांना दैनंदिन कामांसाठी या मार्गाचा उपयोग होतो. मात्र, मोसम नदीवर पूल नसल्यामुळे विशेषतः पावसाळ्यात नदीपात्रातून ये-जा करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे पुलाअभावी वळसा घालून नामपूरला यावे लागत असल्याने वेळ आणि श्रम यांचा अपव्यय होतो. पाण्याची पातळी वाढल्यास वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असते.
या मार्गावर पूल झाल्यास मोराणे, बिजोरसे, परिसरातील गावांमधील संपर्क अधिक मजबूत होईल. शेतमाल वाहतुकीसह विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचारासाठी नेणेही सुलभ होऊ शकेल. त्यामुळे पुल बांधण्यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.