धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 34795
धुळे : साक्री रोडवरील मोतीनाला पुलावर नव्याने करण्यात आलेले काँक्रीटीकरण.
-
मोतीनाला पुलाचे काम दर्जात्मकच
-
बांधकाम विभाग : ‘ते’ पाणी झिरपल्याने स्लॅब कोसळला
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ८ : शहरातील साक्री रोडवरील मोतीनाला पुलाच्या विस्तारीकरणाचे काम पूर्णपणे गुणवत्तापूर्ण असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी (ता. ८) पत्रकाव्दारे केला आहे. चार नोव्हेंबरला बांधकाम सुरू असताना पुलाचा स्लॅब ‘सेंटरिंग’ खचल्याने कोसळला होता. या घटनेमुळे कामाच्या गुणवत्तेबाबत विविध शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेची पाइपलाइन फुटून पाणी झिरपल्याने हे ‘सेंटरिंग’ खचल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
-
खचलेला स्लॅब पूर्णपणे काढून त्याचे बांधकाम नव्याने करण्यात आले असून, सात नोव्हेंबरला नव्या स्लॅबचे काँक्रीटीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यात २६ जानेवारीला या पुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असल्याची माहिती कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. पुलाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीत असताना चार नोव्हेंबरला स्लॅबचे सेंटरिंग खचल्याने काँक्रीटचा भाग कोसळला होता. याप्रकरणी सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून चौकशीची मागणी करण्यात आली होती.
-
कुठलाही गैरहेतू नाही
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने रविवारी सार्वजनिक खुलासा केला आहे. स्लॅबच्या ‘सेंटरिंग’च्या वरच्या बाजूला असलेली महापालिकेची पाणीपुरवठ्याची पाइपलाइन फुटल्याने खाली पाणी झिरपले आणि ‘सेंटरिंग’ खचले. काँक्रीटीकरण सुरू असताना ‘सेंटरिंग’ हलत असल्याचे पर्यवेक्षकीय यंत्रणेच्या तत्काळ लक्षात आल्याने काम रोखण्यात आले. ज्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी वा इजा झाली नाही. ही घटना निव्वळ अपघाती असून, त्यात कोणताही गैरहेतू किंवा अनियमितता नसल्याचे विभागाने स्पष्ट केले.
-
नव्याने स्लॅबचे काम
या घटनेची जबाबदारी स्वीकारत खचलेला स्लॅब पूर्णपणे काढून त्याची उभारणी नव्याने करण्यात आली आहे. पुलाचे बांधकाम ‘संकल्पचित्र मंडळ, मुंबई’ यांच्या प्रमाणित आराखड्यानुसार (टाईप प्लॅन) सुरू असून, नियमानुसारच पोलादाचा (स्टील) वापर करण्यात आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अधिक सतर्कता आणि काळजी घेतली जाईल, असेही विभागाने नमूद केले. हा पूल १८ मीटर रुंदीचा असून, या विस्तारीकरणामुळे साक्री रोडवरील वाहतूक कोंडी कायमची सुटण्यास मदत होणार असल्याचेही पत्रकात नमूद आहे.
-