08896
माणिकखांब : महामार्गावरील दुभाजकांवर वाढलेले गवत व झुडप.
मुंबई-आग्रा महामार्गावरील दुभाजकांवर गवत, झुडपांचे साम्राज्य
अपघात घडण्याची भीती; वळणांवर प्रवास करणे बनले धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी,ता.३ : मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना नवीन समस्येला तोंड द्यावे लागत आहे. महामार्गाच्या दुभाजकांवर मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि झाडी वाढली असून त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना अडथळा निर्माण होत आहे.
पावसाळ्यानंतर महामार्गाच्या दुभाजकांवर उगवलेल्या या गवत व वनस्पतींची योग्य वेळी छाटणी न केल्यामुळे हे गवत अत्यंत उंच वाढले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणारी वाहने, वळणांवर समोरून येणारी वाहतूक किंवा अचानक रस्ता ओलांडणारे प्राणी व नागरिक वाहनचालकांना वेळेवर दिसत नाहीत. परिणामी, अचानक ब्रेक दाबावा लागल्याने किंवा अंदाज न आल्याने अपघात घडण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या वाढलेल्या झाडीमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि तीव्र वळणांवर प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश आणि दुभाजकांवरील झाडीमुळे रस्ता स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे स्थानिकांसह नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून संबंधित विभागाने हे गवत व झाडी हटवण्याची मागणी केली आहे.
------------------------------
प्रतिक्रिया : महामार्गावर मागील काही महिन्यांपासून विविध समस्या जाणवत आहेत. त्यात पुन्हा दुभाजकांवर वाढलेल्या गवताची भर पडली आहे.वास्तविक पाऊस थांबल्यावर हे सर्व गवत व झाडी काढून साफसफाई करणे गरजेचे होते. मात्र आता पाऊस गेल्यानंतरही हे काम सुरु होत नाही.
- कमलेश शिरोडे, वाहनधारक, ठाकूरवाडी
-------------------------