esakal | नाशिकमध्ये रुग्णालयात एकही बेड शिल्लक नाही? रुग्णांसह नातेवाइकांची फरपट
sakal

बोलून बातमी शोधा

covid center bed

नाशिकमध्ये रुग्णालयात एकही बेड शिल्लक नाही? रुग्णांसह नातेवाइकांची फरपट

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाने संपूर्ण शहराला घेरले असून, महापालिकेच्या रुग्णालयांमधील सर्व बेड फुल झाल्याने रुग्णांसह नातेवाइकांची फरपट वाढली आहे. खासगी रुग्णालयांमध्येदेखील समसमान परिस्थिती दिसून येत असून, संपूर्ण शहराची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर पोचल्याचे दिसून येत आहे. महापालिकेतर्फे खासगी कोविड सेंटरमधील बेड दररोज वाढविले जात असले तरी रुग्णांची वाढती संख्या व त्यातही ऑक्सिजन बेडची वाढती मागणी लक्षात घेता येत्या आठ दिवसांत शहरात भयाण परिस्थिती निर्माण होत असल्याचे वास्तव समोर येताना दिसत आहे.

रुग्णांसह नातेवाइकांची फरपट वाढली

गेल्या वर्षीच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट भयानक स्वरूप धारण करून अवतरली आहे. कोरोनाच्या विळख्यातून जो सुटला तो सुटला. ज्याला कोरोनाने घेरले त्यांची अवस्था बिकट आहे. सुरवातीला सर्वसाधारण बेड मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. तक्रारींमध्ये वाढ होत गेली. नंतर ऑक्सिजनचे बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. ऑक्सिजननंतर व्हेंटिलेटर बेडची कमतरता भासू लागली. या समस्या सुटत नाहीत, तोच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला. अशा एक ना अनेक समस्या आ वासून उभ्या राहत असताना आता शहरात महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये बेडच शिल्लक नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

बिटकोत फक्त पाच बेड शिल्लक

बिटको रुग्णालयात चारशे बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले. त्यात सर्वसाधारण फक्त पाच बेड शिल्लक आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा एकही बेड शिल्लक नाही. मेरी कोविड सेंटरमध्ये १८० बेड फुल झाले आहेत. समाजकल्याण वसतिगृहात पाचशे बेडपैकी एकही बेड शिल्लक नाही. शनिवारी उद्‌घाटन करण्यात आलेल्या ३२५ बेडच्या कोविड सेंटरमध्ये सोमवारपर्यंत ५० टक्के, तर मंगळवारी सायंकाळी एकही बेड शिल्लक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैद्यकीय व्यवस्था व्हेंटिलेटरवर

महापालिकेने १४६ खासगी कोविड सेंटर घोषित केले. एकूण सहा हजार १३६ बेडची व्यवस्था करण्यात आली असली असून, त्यात दोन हजार १३९ सर्वसाधारण, दोन हजार ५५९ ऑक्सिजन, आयसीयू ८०१, तर व्हेंटिलेटर असलेल्या ६३७ बेडची व्यवस्था करण्यात आली. सर्वच खासगी कोविड सेंटरमध्ये एक, दोन याप्रमाणेच तेसुद्धा सर्वसाधारण बेड शिल्लक आहेत. त्यामुळे शहराची आरोग्य व वैद्यकीय व्यवस्था व्हेंटिलेटरवर पोचल्याचे वास्तव शहरात दिसून येत आहे.

loading image