ॲंकर
मटण मार्केट परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
--------------------------------------
नामपूर गावाचा कचऱ्याचा डंपीगऐवजी नदीकाठी खच
सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. ९ : शहरातील विविध भागांतून ग्रामपंचायतीच्या घंटागाडीच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारा कचरा मोसम नदीकाठावरील मटण मार्केट परिसरात टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, मोराणे रस्त्यालगत तालुका क्रीडा संकुलाच्या शेजारी ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीत अनेक वर्षांपासून डंपिंग ग्राउंड उपलब्ध असतानाही नागरी वस्तीच्या परिसरात कचरा टाकला जात आहे. त्यातून या भागात आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.
नामपूर शहराचा विस्तार वाढत असताना दैनंदिन कचऱ्याचे संकलन आणि त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे ही ग्रामपंचायतीसमोरील महत्त्वाची जबाबदारी आहे. शहरातील विविध भागांतून घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जातो. मात्र, हा कचरा मटण मार्केट परिसरात टाकला जात असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवासी, व्यावसायिक आणि परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मोराणे रस्त्यालगत तालुका क्रीडा संकुलाच्या शेजारी ग्रामपंचायतीच्या गावठाण हद्दीत कचरा टाकण्यासाठी डंपिंग ग्राउंड अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. असे असतानाही शहरातील कचरा मटण मार्केट परिसरात टाकला जात आहे. डंपिंग ग्राउंडचा वापर टाळून पर्यायी ठिकाणी कचरा का टाकला जातो. याचे ग्रामस्थांना कोड पडले आहे. मटण मार्केट परिसरात कचरा टाकल्याने निर्माण होणारी दुर्गंधी, अस्वच्छता आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लागण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पावसाळ्यानंतरही अशा ठिकाणी कचरा साचून राहिला आहे. केवळ घंटागाडीने कचरा गोळा करणे पुरेसे नसून, त्याचे योग्य वर्गीकरण आणि नियोजनबद्ध विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत आनंद, क्रांती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी आहे.
कोट
ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने मटण मार्केट परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करावी. नागरी वस्तीच्या परिसरात कचरा टाकला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारण्यात येईल. नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छतेतून दिलासा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.
-राकेश सावंत, सामाजिक कार्यकर्ते
फोटोओळी
नामपूर : येथील मटण मार्केट परिसरात साचलेले कचऱ्याचे ढीग