नाफेड, एनसीसीएफच्या कांदा
खरेदीत गैरव्यवहाराचे आरोप
बोगस सातबारा, अनियमित लिलाव आणि कांदा सडल्याच्या तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : केंद्र सरकारच्या ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’ या संस्थांच्या कांदा खरेदी व साठवणूक प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार झाल्याचे आरोप शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहेत. गुरुवारी (ता. ९) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात झालेल्या सुनावणीत तक्रारदारांनी राज्य शासनाच्या उच्चस्तरीय समितीसमोर निवेदने व कथित पुरावे सादर करत संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी केली. जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले.
कांदा खरेदीसाठी बोगस सातबारा उतारे व जमिनींच्या खोट्या नोंदींच्या आधारे निधी लाटल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी केला. तसेच, ऑनलाइन लिलावात सहभागी व्यापाऱ्यांचे कांदे रद्द करून त्यांची २५ लाख रुपयांपर्यंतची अनामत रक्कम जप्त केल्याचा आरोप याचिकाकर्ते विश्वासराव मोरे यांनी केला.
कांदा साठवणुकीसाठी शेळीपालनाच्या शेडचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात कांदा सडून शासकीय निधीचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला. साठवणूक चाळींचे भाडे व देखभाल खर्च वेळेत न मिळाल्याने शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले.
आर्थिक व्यवहारांची पडताळणी करा
कांदा खरेदीतील आर्थिक व्यवहार, शेतजमिनींच्या नोंदी, लिलाव प्रक्रिया आणि साठवणूक व्यवस्थेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. केवळ कागदोपत्री तपासणी न करता प्रत्यक्ष नोंदी, इलेक्ट्रॉनिक माहिती आणि आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्याची मागणीही तक्रारदारांनी केली.