Latest Marathi News | नाळेच्या पाझर तलावाला भगदाड; 70 एकर शेतीतील पीक जलमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton field inundated by the bursting of the seepage lake.

नाळेच्या पाझर तलावाला भगदाड; 70 एकर शेतीतील पीक जलमय

मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह तालुक्यात दोन दिवस झालेल्या संततधारेमुळे नाळे (ता. मालेगाव) येथील पाझर तलावाला मोठे भगदाड पडले. तलावाचे पाणी वाहून गेल्याने व जोरदार प्रवाहामुळे सुमारे २५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे ७० एकर शेतीतील पीक जलमय झाले. देवारपाडे, शेंदुर्णी, साजवहाळ या गावातील पिकांचेही काही प्रमाणात नुकसान झाले.

कापूस, मका, डाळिंब, कांदा या पिकांसह शेतातील सुपीक माती वाहून गेली. सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. (Nale pond destroyed in flood 70 acres of agricultural crops flooded Nashik Latest Marathi News)

दरम्यान, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी जलसंधारण अधिकाऱ्यांसमवेत नुकसानीची पाहणी केली. नाळे येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश निकम व सहकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

श्री. शर्मा यांनी उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांना बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव तत्काळ दाखल करण्याची सूचना दिली. नाळेनजीकच्या साजवहाळ येथील गाव तलावाच्या भिंतीमधून पाणी पाझरत असून, त्याची पाहणी केल्यानंतर शाखा अभियंता युवराज अहिरे यांना उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आले. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

संततधारेमुळे नाळे येथील पाझर तलाव संपूर्ण भरला. सोमवारी (ता. १९) रात्री अकराच्या सुमारास बंधारा फुटण्यास सुरवात झाली. पहाटे बंधाऱ्याला मोठे भगदाड पडून तलावाचा बांध फुटला. त्यात मनीष सूर्यवंशी, देवबा म्हस्के, भरत चिकने, सुधाकर सरोदे, रामा म्हस्के, भिकन गुढे, बाळू म्हस्के, पिंटू सरोदे, संजय चिकने आदींसह २५ ते ३० शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कापूस, डाळिंब, मका, कांदा या पिकांना प्रामुख्याने फटका बसला. सुपीक माती वाहून गेल्याने जमीन नापीक झाली. शेतात व विहिरीत पाणी शिरल्याने काही विहिरी बुजल्या गेल्या. नदी व बंधाऱ्याकाठची शेती वाहून गेली.

हेही वाचा: चिमुरड्याने गिळले नेलकटर; MVP वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वी शस्त्रक्रिया

पावसामुळे मनोज शिंदे यांची गाय मृत झाली. नांदगाव बुद्रुक येथील युवराज गोसावी यांच्या घराची दक्षिणोत्तर भिंत कोसळली. घाणेगाव येथील साहेबराव कसेकर यांच्या घराची भिंत पडली. सुदैवाने या दोन्ही दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. श्री. निकम यांनी नाळे येथील पाझर तलाव फुटल्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

तलाव फुटल्याने पूर्ण पाणी वाहून गेले आहे. आगामी काळात नाळे व देवारपाडे येथील शेतकऱ्यांना पाणीटंचाईची भीती व्यक्त करीत उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्यासमवेत एकनाथ लांबखेडे, मनीष सूर्यवंशी, देवा पाटील, श्याम गांगुर्डे, स्वप्नील भदाणे व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा: Crime Update : PAN Card अपडेटच्या नावाखाली 5 लाखांना गंडा

Web Title: Nale Pond Destroyed In Flood 70 Acres Of Agricultural Crops Flooded Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..