13418
वणी : ''नमो जलसंवर्धन पाणी पुनर्भरण अभियाना''च्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करताना खासदार भास्कर भगरे, सोबत नितीन गांगुर्डे, वैभव मोराडे आदी.
पाणी पुनर्भरण करून भूजल पातळी वाढविण्याची गरज
भास्कर भगरे : दिंडोरीत ''नमो जलसंवर्धन पाणी पुनर्भरण अभियान
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ३१ : सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे. पाणी संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटक पुढे आला, तरच येणाऱ्या दुष्काळावर आपण यशस्वीपणे मात करू शकतो. पावसाचे पाणी मिळणे आता कठीण झाले असले, तरी उपलब्ध होणारे पाणी जमिनीत मुरवून भूजल पातळी वाढवणे आणि पाणी पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार भास्कर भगरे यांनी केले.
दिंडोरी येथे दिंडोरी नगरपंचायत, जलदूत फोरम व अरुणोदय सार्वजनिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत ''नमो जलसंवर्धन पाणी पुनर्भरण अभियान'' सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावा यासाठी जलजागृती केली जात आहे. अभियानाच्या विशेष माहितीपत्रकाचे प्रकाशन खासदार भगरे यांच्या हस्ते करण्यात आले; त्या प्रसंगी ते बोलत होते.
भगरे पुढे म्हणाले, "आपल्याकडे धरणांमध्ये भरपूर पाणीसाठा उपलब्ध असला, तरी जिल्ह्याच्या पूर्व भागातील अनेक तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याकडे पिण्याचे पाणी उपलब्ध असले, तरी शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्या ''ऑक्टोबर हिट''मुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे आपल्याला पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागेल. या वेळी सहाय्यक निबंधक वैभव मोराडे, नगरसेवक नितीन गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी तुषार वाघ, समाधान अपसुंदे, बापू चव्हाण, भगवान जाधव, डॉ. संदीप गोसावी, छबु मटाले, सचिन वडजे, सतीश वाळके, भारत खांदवे, आदित्य नाईकवाडे आदी उपस्थित होते.