फोटो ओळी 11207
नांदगाव ः तहसीलदार कार्यालयात जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक व तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा)च्या वतीने सुरू असलेले ठिय्या आंदोलन.
दुष्काळग्रस्तांना दिवाळीची मदत मिळावी
शिवसेनेचे (उबाठा) तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन
नांदगाव, ता. १६ : दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी शासनाने जाहीर केलेली पाच हजारांची मदत अद्याप मिळालेली नसल्याच्या मुद्द्यावर सोमवारी (ता. १६) येथील तहसीलदार कार्यालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दिवाळीनंतरही शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा न झाल्याच्या निषेधार्थ पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रवीण नाईक व तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तहसील कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले. शासनाने जाहीर केलेली मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शिवसेनेने दिला.
शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजारांची मदत देण्याचे जाहीर केले होते. दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सणासुदीत या मदतीचा आधार मिळणे अपेक्षित होते. मात्र, दिवाळी संपून आठ दिवस होऊनही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
प्रशासनाकडे शेतकऱ्यांची माहिती, आवश्यक कागदपत्रांचा तपशील असतानाही मदतीसाठी विलंब का होत आहे, असा सवाल निवेदनातून उपस्थित केला आहे. आंदोलनादरम्यान शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनात शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा समन्वयक सुनील पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर, तालुका उपप्रमुख प्रवीण सूर्यवंशी, अशोक आप्पा पदमर, तालुका सचिव शैलेश सोनवणे, नांदगाव शहरप्रमुख श्रावण आढाव, मनमाड शहरप्रमुख माधव शेलार, जाफर मिर्झा, तालुका समन्वयक दिलीप नंद, माजी नगरसेवक मायकल फर्नांडीस, ज्ञानेश्वर पवार, सदाशिव घुगे, दामू सापटे, सूर्यभान खैरनार, बबन उगले, शरद शिंदे, राजू सानप, वैभव घोटकर, सौरभ निकम, सतीश बरावरकर, अस्फाक शेख आदींसह शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते.
...........