पान तीन
------------
नांदगावमध्ये कृषी साहित्य लाभासाठी उद्या सोडत
ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, ड्रोनसह विविध उपकरणांसाठी लाभार्थ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
बाणगाव बुद्रुक, नांदगाव, ता. १७ : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे श्रम व आर्थिक खर्च कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद सेस योजना २०२६-२७ अंतर्गत कृषी साहित्य अनुदान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,शेतकरी ड्रोन,कडबाकुट्टी यंत्र आणि विद्युत पंपसंच आदी कृषी साहित्याचा लाभ मिळणार आहे. या लाभासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांमधून गुरुवार (ता.१९) सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.
नांदगाव पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी ११ ही प्रक्रिया पडणार आहे. अशी माहिती कृषी अधिकारी सुरेश चौधरी, कृषी विस्तार अधिकारी भटुलाल वाघ, किरण मोरे, निखिल सैंद्रे यांनी दिली.
जिल्हा परिषद सेस २०२६-२७ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत विविध कृषी साहित्य व आधुनिक उपकरणांच्या खरेदीसाठी नियमानुसार ५० टक्के किंवा निर्धारित मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे आधुनिक कृषी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
या योजनेत ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,कडबाकुट्टी मशीन,विद्युत पंपसंच तसेच शेतकरी ड्रोन यांसारख्या शेतीसाठी उपयुक्त उपकरणांचा समावेश आहे. शेतीची कामे कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात पूर्ण व्हावीत,उत्पादन खर्चात बचत व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.
विशेषतः अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकरी,अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्याने लाभ मिळण्याची तरतूद आहे. योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले असून,आता लकी ड्रॉद्वारे लाभार्थ्यांची निवड होणार असल्याने शेतकऱ्यांचे या सोडतीकडे लक्ष लागले आहे.