पान तीन मेन
---------------------
11202, 11201
नांदगाव : मालेगाव रस्त्यावर टेलिफोन कंपनीच्या केबल टाकण्याचे काम. दुसऱ्या छायाचित्रात जलवाहिनीला लागलेली गळती.
खासगी टेलिफोन कंपनीच्या केबल कामामुळे मुख्य जलवाहिनी फुटली
ऐन दिवाळीत हजारो लिटर पाण्याची नासाडी; पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. १३ : शहरासह परिसरातील ५६ खेड्यांच्या ग्रामीण भागाला पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत असताना, दुसरीकडे खासगी टेलिफोन कंपनीच्या भूमिगत केबल टाकण्याच्या कामातील निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐन दिवाळीच्या सणात शहरातील मुख्य बाजारपेठ, हनुमाननगर, साकोरा रस्ता, येवला रस्ता आणि परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
शहरात गेल्या महिनाभरापासून खासगी टेलिफोन कंपन्यांकडून भूमिगत केबल टाकण्यासाठी शहरात विविध ठिकाणी खोदकाम आणि एचडीडी ड्रिलिंगची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, जमिनीखालील मुख्य जलवाहिन्यांची कोणतीही खात्री किंवा पुरेशी माहिती न घेता हे काम केल्यामुळे जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. याच निष्काळजीपणामुळे नांदगाव शहरासह परिसराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे पिण्यायोग्य पाणी वाया गेले.
दिवाळीच्या सणात घरांची साफसफाई, सणाची तयारी आणि दैनंदिन वापरासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असताना नळांना पाणी न आल्याने नागरिकांची, विशेषतः महिला वर्गाची मोठी हेळसांड झाली. आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना या प्रकारामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
वारंवार पाणीगळती
गेल्या तीस दिवसांपासून येथील जलवाहिन्या कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत खंडित होत आहेत. कधी गिरणा धरणातील उद्भव विहिरीवरील उपसा पंप, तर कधी न्यू पांझण येथील जलशुद्धीकरण केंद्रातील उपसा पंप नादुरुस्त होणे, सांधे उखडून जलवाहिन्या फुटणे असे प्रकार वाढले आहेत. वारंवार जलवाहिन्या नादुरुस्त होणे आणि लाखो लिटर पाणी वाया जाणे, या तांत्रिक दोषांची नेमकी जबाबदारी कोणाची, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एकिकडे या गळत्या सुरू असताना, दुसरीकडे टेलिफोन कंपन्यांच्या केबल्ससाठी सुरू असलेल्या मनमानी खोदकामामुळे सण, दुष्काळ व कृत्रिम टंचाई यांचे प्रशासनाला वा टेलिफोन कंपनीच्या कंत्राटदारांना अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
यंत्रणा हतबल
गिरणानगर, श्रीरामनगर, मल्हारवाडी आदी शहरालगतच्या ग्रामीण हद्दीतील नागरी वसाहतींना गेल्या महिनाभरापासून पिण्याचे पाणी मिळालेले नाही. जिल्हा परिषदेची देखभाल-दुरुस्ती करणारी यंत्रणा याप्रकरणी पूर्णपणे हतबल झाली असून, पाईपलाईन लिकेजची जुनीच सबब पुढे करून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.
५६ खेडीची अशी दुरावस्था झाली असूनही जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ यंत्रणेने कुठल्याही प्रकारची नोंद घेतलेली नाही. यामुळे सणासुदीत नागरिकांची विशेषत: महिला वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वारंवार खराब होणाऱ्या या वाहिनीची शासनाने दुष्काळी निधीतून देखभाल, दुरुस्ती करावी.
- ॲड. उमेशकुमार सरोदे पाटील, नांदगाव