पान दोन मेन
---------------
04181
जुनी शेमळी : नांदिन ते पिसोळबारी मार्गावरील रस्तांची झालेली दुरावस्था.
नांदिन-पिसोळबारी रस्ता ३० वर्षांपासून दुरुस्तीच्य प्रतिक्षेत
खड्ड्यांमुळे प्रवास बनला नकोसा; खडीकरण व डांबरीकरण करण्याची ग्रामस्थांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
जुनी शेमळी, ता. १३ : बागलाण तालुक्यातील नांदिन ते पिसोळबारी दरम्यानच्या सुमारे अर्धा किलोमीटर रस्त्याची गेल्या ३० वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील खडी पूर्णपणे उखडून गेल्याने माठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे अतोनात नुकसान होत असून वाहने पलटी होऊन अपघातांच्या घटनाही घडत आहेत. मात्र, संबंधित प्रशासकीय विभागाचे या गंभीर समस्येकडे अद्यापही दुर्लक्षच असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नांदिन गावापासून ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याच्या परिसरातील पिसोळबारीपर्यंतच्या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. मात्र, या मार्गाच्या मध्यभागी असलेला सुमारे अर्धा किलोमीटरचा रस्ता आजही पूर्णपणे अर्धवट अवस्थेत आहे. १९९७ पासून आजतागायत या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या भागांना जोडणारा हा मधला तुकडा गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या अनास्थेमुळे उपेक्षित राहिला आहे.
गेल्या तीन दशकांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे. या रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी नांदिन व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
--------
जीव मुठीत धरून प्रवास; पर्यटकांचीही गैरसोय
या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतीमालाची वाहतूक करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. रस्त्यावरील खडी उखडल्याने आणि जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अचूक अंदाज येत नसल्याने अपघातांची शक्यता असते. तसेच नांदिन गावाजवळील डोंगराच्या पायथ्याशी आणि धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीवर ऐतिहासिक पिसोळ किल्ला आहे. या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व असल्याने राज्यभरातून पर्यटक, इतिहासप्रेमी, तसेच स्थानिक नागरिकांची या भागात सतत ये-जा असते; परंतु पिसोळबारीकडे जाणाऱ्या मार्गातील या अर्धा किलोमीटरच्या पट्ट्यामुळे येणाऱ्या पर्यटकांचीही मोठी गैरसोय होत आहे.
04180
नांदिन ते पिसोळबारी या रस्त्याचा प्रश्न तीस वर्षांपासून प्रलंबित आहे. गावापासून पिसोळबारीपर्यंत रस्त्याचे काम झाले असताना मधील केवळ अर्धा किलोमीटरचा रस्ता १९९७ पासून आजपर्यंत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. संबंधित विभागाने आता तरी या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा."
पुंडलिक शिंदे, माजी सरपंच, नांदिन