पान-४ मेन
फोटो- 08843
नांदूरमध्यमेश्वर अभ्यारण्य.
नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात पक्षी सप्ताहास सुरुवात
पक्षीगणनेत ११ हजार ७८० हजार स्थलांतरीत; विदेशी-देशी पक्ष्यांची नोंद
निफाड, ता. ६ ः वन्यजीव विभाग नाशिक अंतर्गत नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त पक्षी सप्ताहास सुरुवात झाली. वन्यजीव विभाग नाशिकचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर अध्यक्षस्थानी होते. चितमपल्ली यांची जयंती ५ नोव्हेंबर व बर्ड मॅन सालीम अली यांची जयंती दिनांक १२ नोव्हेंबर असून, ५ ते १२ नोव्हेंबर यादरम्यान पक्षी सप्ताह साजरा केला जातो. शुक्रवारी (ता. ६) पक्षी सप्ताहाच्या सुरवातीस सकाळी सातपासून पक्षीमित्र, पक्षी अभ्यासक, छायाचित्रकार, वनाधिकारी, पक्षीमार्गदर्शक, संरक्षणपथक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पक्षीगणना करण्यात आली.
..........
मारुती चितमपल्ली व बर्डमॅन डॉ. सलीम अली यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी पक्षीमित्र संघटनेतर्फे ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता उगावकर यांना जीवनगौरव व पक्षीमित्र आनंद बोरा यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ पक्षीमित्र उगावकर यांनी त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल व पक्षीनिरीक्षणाबाबत माहिती दिली. तसेच डॉ. सालीम अली यांच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ. उत्तम डेर्ले यांनी पक्षी सप्ताहानिमित्त मनोगत व्यक्त करताना पाणथळ जागेत वाढत असलेला टायफा वनस्पती काढणे व पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अभयारण्य क्षेत्रात बोरवेल घेणे व तलाव तयार करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आनंद बोरा यांनी मागील दौऱ्यात वनपरिक्षेत्र अधिकारी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे अभयारण्य क्षेत्रात पाणीपातळी वाढल्याचे सांगितले. सरपंच बोडके यांनी अभयारण्य क्षेत्रातील गोदावरी पात्रातील पाणवेलींचा बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले. उपवनसंरक्षक कृष्णा भवर यांनी पक्षीसप्ताह साजरा करण्याचा उद्देश व या वर्षी अभयारण्यात दाखल झालेल्या नवीन परदेशी पक्ष्यांबद्दल माहिती दिली.
वनपरीक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी सूत्रसंचालन करत मानवी जीवनात व शेती व्यवसायात पक्ष्यांचे महत्त्व उपस्थितांना शास्त्रीय पद्धतीने पटवून दिले व शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले.
उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग नाशिक कृष्णा भवर, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदूरमध्यमेश्वर हिरालाल चौधरी, ज्येष्ठ पक्षीमित्र दत्ता काका उगावकर, पक्षीमीत्र डॉ. उत्तम डेरले, आनंद बोरा, अनंत सरोदे, वनपाल, वनरक्षक, गाइड, संरक्षणपथक व ग्रामस्थ उपस्थित होते.