NSK26H34600
नंदुरबार : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केलेली अग्निशस्त्रांबरोबर पोलिस अधिक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक आशित कांबळे, निरीक्षक अभिषेक पाटील आदी.
---
शस्त्रांची अवैध तस्करी; आंतरराज्यीय टोळी गजाआड
---
सात अग्निशस्त्र, ४६ जिवंत काडतूसांसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ५ : बनावट पिस्तूलची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळीस नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. त्यांच्याकडून सात अग्निशस्त्र, ४६ जिवंत काडतूसांसह एकूण १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पृथ्वीराज ऊर्फ गोलू मध्य प्रदेशातून अवैध गावठी लोखंडी अग्निशस्त्रांची धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे व गुजरातमध्ये तस्करी करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अभिषेक पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार केली. संशयित पृथ्वीराज ऊर्फ गोलू कारने मध्य प्रदेशातून म्हसावदमार्गे अवैध लोखंडी अग्निशस्त्र विक्रीसाठी असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून भरधाव कारची तपासणी केली. कारमध्ये पृथ्वीराजसिंग रणजितसिंग जाधव (वय २६, रा. शिक्षक कॉलनी, सारंगखेडा, ता. शहादा) महेश भाईदास कोळी (२६, तऱ्हाडी, ता. शहादा) होते. २५ हजारांची गावठी लोखंडी कट्टा, सहा हजारांचीतीन जिवंत काडतूस आढळले. कारसह एकूण पाच लाख ३१ हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला व पृथ्वीराजसिंग जाधव व महेश कोळी यांना अटक केली. त्यांच्यावर म्हसावद पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, पृथ्वीराजसिंग याने काही महिन्यांमध्ये गावठी कट्टा व जिवंत काडतूस धुळे, जळगाव व गुजरातमध्ये विक्री केली आहे. पथकाने भाविन गजेशभाई वरिया (२६, प्लॉट क्रमांक ३५, मनीषा सोसायटी, साईपूजन, जुना कोसाड रोड, चौरसी, सुरत) याच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, ब्रिजेशभाई सतिषभाई जानी (३७, कर्मचारीनगर, डेडीयापाडा, जि. नर्मदा, गुजरात) याच्या ताब्यातून गावठी कट्टा व ३९ जिवंत काडतूस, राहुल वाल्मीक सूर्यवंशी- चौधरी (धुळे) याच्या ताब्यातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस, जयेश निंबा पाटील- राजपूत (३०, सारंगखेडा, ता. शहादा, ह.मु. नाशिक) याच्या ताब्यातून गावठी कट्टा, फरारी संशयिताच्या घरातून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस, असे एकूण सात देशी कट्टे, ४६ जिवंत काडतूस, कार, मोबाईल, असा एकूण १३ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
फरारी संशयितांचा शोध
कट्टे व जिवंत काडतूस खरेदी व विक्रीसाठी संशयितांना मदत करणारे गोपाल ऊर्फ सागर हिरामन ठाकरे (२८, डोंगरगाव, ता. शहादा) राहुल सुरेश मोरे (२१, खेडदिगर, ता. शहादा), लकी ऊर्फ कमलेश संजय पाटील (१९, पानसेमल, जि. बडवाणी) भूषण राजू चौधरी (२६, सेंधवा, जि. बडवाणी), हरीश ऊर्फ सनी कैलास चौधरी (२४, धुळे) यांना अटक केली आहे. संशयितांच्या फरारी साथीदारांचा शोध सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक महेश निकम व विकास गुंजाळ, राकेश वसावे, हवालदार दिनेश चित्ते, दत्तात्रय बागल, जितेंद्र पाडवी, मुकेश तावडे, दिनेश वसुले, मोहन ढमढेरे, सचिन वसावे, अंमलदार मनोज महाजन, अभय राजपूत, भरत उगले, विनोद पाटील, हेमंत बारी, रामेश्वर चव्हाण, रवींद्र अहिरे, रोहिणी धनगर यांनी केली.