फोटो : NSK26H31727
नंदुरबार : अन्न व औषध प्रशासनाने जप्त केलेला पान मसाला.
-------------
नंदुरबारला ३९ लाखाचा पान मसाला जप्त
अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ८ : अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसालाची वाहतूक करणारे आयशर वाहन पकडून एकूण अंदाजित ३९ लाख ४७ हजार १५० रुपये किमतीचा पानमसाला जप्त केला आहे.
बुधवारी (ता. ७) पहाटे सुमारे २.४५ वाजता करण चौफुली ते जकातफाटी रस्त्यावर, करण चौफुलीजवळ धुळेकडे जाणाऱ्या वाहनाची (क्र. एमएच- ४८- डीक्यु- ६०६२) तपासणी करण्यात आली. या वेळी वाहनामध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला विमल पानमसाला व वी- १ तंबाखू आढळून आली. यात ३९ लाख ४७ हजार १५० रुपयांचा पान मसाला, ३० लाख रूपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण अंदाजित ६९ लाख ४७ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र रोहित डौले, संकेत आबा सदाफुळे यांच्या पथकाने आयुक्त तुकाराम मुंडे, सहआयुक्त मंगेश माने व सहायक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या प्रकरणी वाहनचालक मोहम्मद हलीम व इतर संबंधितांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात प्रतिबंधित अन्न पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री यावर सातत्याने विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येत असून, अशा प्रकारच्या गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.