34730
नंदुरबार : संशयितांकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल. शेजारी पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील व पथकातील कर्मचारी.
-----------------
घरफोडीच्या गुन्ह्यातील दोघांना अटक
लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : शहरात भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात दोन संशयित यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २० लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली.
नंदुरबार शहरातील पुष्पा विनोदकुमार चिंतलागे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातून एकूण १५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. यात सोने,चांदीचे दागिने व रोख रकमेचा समावेश होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा समांतर तपास सुरु असताना लालबाग कॉलनी परीसरातील घरफोडी ही आकाश सोनार व त्याचा साथीदार रोहित मोरे यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळाली. त्यानंतर संशयित कारने गुन्ह्यातील सोने चांदीचे दागिने विक्री करण्यासाठी संशयित धुळे चौफुलीकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने सापळा रचला. जगतापवाडी चौफुली येथे नाकाबंदी करून पथकाने कारची (जीजे०५ जेबी ७७८८) तपासणी केली. या वाहनात आकाश भिका सोनार (वय २७, रा. ओम साई पार्क, होळ शिवार, नंदुरबार), रोहित किशोर मोरे (वय २१, रा. वाठोडा ता. शिरपूर जि. धुळे ह.मु. शांतीनगर, सुरत गुजरात) हे दोघे बसलेले होते. तपासणीत एका लाल रंगाच्या पिशवीमध्ये १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने मिळून आले. संशयितांकडून १४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व ६ लाख रुपये किमतीचे गुन्हा करण्यासाठी वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण २० लाख ५८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
-------
यांनी केली कामगिरी
सदरची कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधिक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिषेक पाटील, उप निरीक्षक महेश निकम, विकास गुंजाळ, हवालदार दिनेश चित्ते, मुकेश तावडे, योगेंद्र सोनार, मोहन ढमढेरे, अभय राजपुत, हेमंत बारी, मनोज महाजन, विनोद पाटील, रोहिणी धनगर यांच्या पथकाने केली आहे.