(टुडे पान एक मेन )
फोटो : NSK26H32010
नंदुरबार : गुणवंत गौरव सोहळ्यात बोलताना चंद्रकांत रघुवंशी. समवेत किशोर दराडे, राजेश पाडवी, आमश्या पाडवी, शिरीष चौधरी, रत्ना रघुवंशी, मनोज रघुवंशी, ॲड. राम रघुवंशी आदी.
---
खेळाडूंसाठी नंदुरबारात क्रिकेट स्टेडियम उभारणार
गुणवंत गौरव सोहळ्यात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ११ : शहरात दर्जेदार क्रिकेट स्टेडियम उभारणार असून, या प्रकल्पासाठी शासनाने ५० टक्के निधी द्यावा, तर उर्वरित ५० टक्के निधी पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध केला जाईल. नंदुरबार जिल्ह्यात क्रिकेटसह विविध क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळविण्याची क्षमता असलेले खेळाडू आहेत. मात्र, त्यांना सरावासाठी दर्जेदार मैदान आणि आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. शहरात सुसज्ज क्रिकेट मैदान उभारल्यास स्थानिक खेळाडूंना सरावासाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल. त्यातून गुणवंत खेळाडू घडण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला.
नंदुरबार तालुका विधायक समिती शैक्षणिक परिवारातर्फे संस्थेचे संस्थापक चेअरमन स्व. गजमल तुळशीराम पाटील यांच्या स्मृती समारंभ सोहळ्यानिमित्त आयोजित गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान आमदार रघुवंशी यांच्या हस्ते झाला. संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेताना त्यांनी शिक्षकांची भूमिका, आश्रमशाळांमधील सुविधांचा विकास, गुणवत्ताधारित भरती आणि शिक्षण क्षेत्रातील अडचणी सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांची माहिती दिली.
कार्यक्रमास आमदार किशोर दराडे, आमदार राजेश पाडवी, आमदार आमश्या पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, व्हा. चेअरमन मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित, पालिकेचे उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, माजी सभापती विक्रमसिंह वळवी, नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी, परवेज खान, उद्योजक डॉ. रवींद्र चौधरी, ठाणसिंग गिरासे, देवमन पवार, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
बी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, स्व. बटेंसिंह रघुवंशी यांच्या मार्गदर्शनातून संस्थेने हा उपक्रम सुरू केला. शिक्षकांच्या हातात समाजाचे भविष्य घडविण्याचे सामर्थ्य आहे. आजच्या परिस्थितीत शैक्षणिक संस्था चालविणे आव्हानात्मक झाले आहे.
आमदार किशोर दराडे यांनी टीईटीसंदर्भातील नियम रद्द करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार राजेश पाडवी यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे माध्यम असल्याचे सांगितले. आमदार आमश्या पाडवी यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. या वेळी माजी आमदार शिरीष चौधरी आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. माधव कदम यांनी सूत्रसंचालन केले.