NSK26H32735
नंदुरबार : निवासी जिल्हाधिकारी आशा संघवी यांना निवेदन देताना शिवसेना जिल्हाप्रमुख पंडित माळी. शेजारी डॉ. हेमंत शर्मा, सागर पाटील, रीना पाडवी, दिनेश सोनवणे, मन्नान गणी शिकलीकर, रमेश पाटील आदी.
-----
मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ५ हजार १ रुपये सुपूर्द
---
शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तुटपुंजी मदत जाहीर केल्याने आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १६ : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना, राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. यातून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केल्याच्या आरोप करीत शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांतर्फे पाच हजार एक रुपयांची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. पाच हजार रुपयांत मुख्यमंत्र्यांनी दिवाळी साजरी करून दाखवावी, असे आव्हान देऊन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेने केली.
नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. पाणीटंचाई, जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न आणि शेतीचे नुकसानामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक मदत मिळणे अपेक्षित असताना, सरकारने अपुरी जाहीर केली आहे. दुष्काळाच्या झळा केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर शेतमजूर, मोलमजुरी करणारे कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनाही बसत आहेत. त्यामुळे शासनाने शेतकरी आणि कष्टकरी जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
खाद्यतेल, साखर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यात वीजबिल भरण्यास उशीर झाल्यास वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप शिवसेनेने केला. शेतकऱ्यांना अपेक्षित मदत न दिल्यास शिवसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
जिल्हाप्रमुख पंडित माळी, उपजिल्हा प्रमुख डॉ. हेमंत शर्मा, युवासेना जिल्हाधिकारी सागर पाटील, महिला जिल्हा आघाडीप्रमुख रीना पाडवी, जिल्हा सचिव दिनेश सोनवणे, कार्याध्यक्ष मन्नान गणी शिकलीकर, तालुकाप्रमुख रमेश पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोपे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्तियाज कुरेशी, युवासेना सचिव अक्षय श्रीखंडे, खंडू माळी, भक्तवत्सल सोनार, संगीता माळी, दीपाली वाघ, जयश्री सोनवणे, भरत गुरव, निंबा पाटील, गोपाल राजपूत, जनक त्रिवेदी, संतोष पाटील, रिजवान शेख आदी उपस्थित होते.