(पान १ ला मेन)
-------------------------------
फोटो : NSK26H31344 (पिंटुराज वसावे)
फोटो : NSK26H31343 (अमिताबाई वसावे)
फोटो : NSK26H31342
नंदुरबार : पावसाअभावी सुकलेली कपाशी.
-------------------------
(लोगो : चित्र दुष्काळाचे)
नंदुरबार
----------
बळीराजाला शासनाने द्यावा मदतीचा हात
जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करण्याची गरज
विजय वळवी : सकाळ वृत्तसेवा
धानोरा, ता. ४ : नंदुरबार तालुक्यात पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिकांची अवस्था फार बिकट झाली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिके कमजोर होऊन करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपासून आतापर्यंत केलेला खर्चही उत्पादनातून निघणार की नाही, अशी गंभीर परिस्थिती नंदुरबार तालुक्यात निर्माण झाली आहे. अशा स्थितीत बळीराजाला शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
--------
पावसाअभावी शेतीसोबतच पशुधनासाठी चाऱ्याचीही मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शेतांमध्ये हिरवा चारा उपलब्ध नसल्याने आगामी काळात चाराटंचाईची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे पशुधनाचे पालनपोषण करण्याचे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान आहे. काही शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्त्रोत उपलब्ध आहेत. विहीर, बोअरवेल किंवा अन्य माध्यमातून पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने उपलब्ध पाण्याचा पिकांना वेळेवर उपयोग करता येत नाही. त्यामुळे पिकांना आवश्यक तेव्हा पाणी देण्यास अडचणी येत आहेत. नैसर्गिक पावसाचा मोठा खंड पडल्याने आता उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याची पातळी खाली जाऊ लागली आहे. उत्पन्न तर येणारच नाही. मात्र, त्या परिस्थितीत पिके वाचविली तर गुरांसाठी चारा तरी उपलब्ध होऊ शकेल, या आशेने शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
यंदा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आतापासूनच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पेरणी, बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरी यासाठी मोठा खर्च करूनही उत्पादन खर्चही भरून निघण्याची परिस्थिती नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने नंदुरबार तालुक्यातील पिकांची तातडीने पाहणी करून पंचनामे सुरू करावेत. शेतकऱ्यांनी केलेल्या खर्चाच्या प्रमाणात नुकसानभरपाई द्यावी. तसेच, पात्र शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करावा, अशी मागणी होत आहे. के वाचविण्यासाठी वीजपुरवठा सुरळीत आणि नियमित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
---------
कापसाचे उत्पादन घटणार
नंदुरबार तालुक्यात कापूस, मका, ज्वारी, भात, तुर, अजवान, सोयाबीन, मिरची, पपई, केळी आणि मूग या पिकांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यात सर्वात जास्त क्षेत्र कापूस पिकाचे म्हणजे ७५ टक्के आहे. यात कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाअभावी जसा कोरडवाहू शेतकरी अडचणीत आला आहे तसा बागायत कापूस उत्पादकदेखील अडचणीत आहे. तालुक्यात जेमतेम ५० टक्के पाऊस झालेला असल्याने जमिननीची पाणीपातळी खाली गेलेली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थितीचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. मका, ज्वारी यासारखी पिके शेतात नावालाच उभी असून, दाणे भरले गेले नसल्याने केवळ चाऱ्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल. मिरची उत्पादकही अडचणीत आला आहेत. तुर, सोयाबीन या पिकांचे उत्पादन येण्याची आशा उरलेली नाही.
-------
शेतकऱ्यांच्या
शासनाकडून अपेक्षा
- तातडीचे पंचनामे करून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी
- पिकांचे तत्काळ पंचनामे करून दिवाळीअगोदर पीकविमा द्यावा
- कोरडवाहू शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक मदत द्यावी
- जनावरांनासाठी छावण्या सुरू करून चारा उपलब्ध करून द्यावा
- उन्हाळ्यात गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई होऊ नये यासाठी उपाययोजना कराव्यात
- तालुक्यातील किती गावांना संभाव्य पाणीटंचाईशी तोंड द्यावे लागणार आहे, याचा आराखडा प्रशासनाने जाहीर करावा
- शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीच्या सर्व करांमध्ये सुट देण्यात यावी
- शिक्षणासाठी बसने ये- जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना बसचा पास मोफत द्यावा
- तापमानाचा पारा आतापासूनच वाढला असून, आरोग्य यंत्रणा सक्षम कराव्यात
- मजुरांचे स्थलांतर होऊ नये यासाठी स्थानिक भागात रोजगार उपलब्ध करावा
- खरीप हंगामाची भरपाई देतांना शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठीही मदत द्यावी
- शेतकऱ्याच्या उपस्थितीत नुकसानीचे पंचनामे करून काय नोंद केली त्याची माहिती मिळावी
- बागायती पिके पाण्याअभावी हातची जाऊ नयेत, यासाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा
- कृषी विभाग व ग्रामपंचायतींनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानांतर्गत विविध कामे हाती घ्यावीत
- आगामी काळात प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी गाळ काढण्याची कामे हाती घ्यावीत
- रोजगार हमी व जलजीवन मिशनच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे
- रब्बी हंगामासाठी बियाणे आणि खते शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध करावीत
- शेतीपुरक व्यवसायांना आर्थिक मदत करून शेती व्यवसायाच्या अर्थचक्राला बळ द्यावे
- शेतमजुरांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी गावपातळीवर विविध योजनांची कामे सुरू करावीत.
---------------
नंदुरबार तालुक्यातील मंडळनिहाय पाऊस (मिमी)
नंदुरबार : ३९.३
कोरीट : ५०.८
खोंडामळी : २६.२
रनाळा : २६.३
धानोरा : ४७.१
आष्टे : ६३.६
शनिमांडळ : ४०.८
------------------
एकूण : ४२.०
----------------
पाण्याअभावी कोरडवाहू शेतातील पिके पुर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ज्यांच्या शेतात पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे, असे शेतकरी आपल्या शेतातील पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हातात कोणतेही उत्पन्न येणार नसले तरी निदान गुरांना चारा उपलब्ध होऊ शकेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने पाणी देतांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- पिंटुराज कृष्णा वसावे, इसाईनगर (ता. नंदुरबार)
----------
माझ्या शेतात पाण्याचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे मला पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करावी लागते. यंदा पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत देतांना शासनाने पंचनामे करण्याची प्रक्रिया वेगाने राबबावी. पीकविम्याचा लाभ लवकर मिळवून द्यावा.
- अमिताबाई वसावे, धानोरा (ता. नंदुरबार)